मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : कौन बनेगा करोडपतीचा पंधरावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. आतापर्यंत या सिझनमध्ये दोन स्पर्धकांनी एक कोटी रुपयांपर्यंतची मजल गाठली. सध्या सोशल मीडियावर या शोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. काँग्रेस नेते रितू चौधरी यांनीसुद्धा ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन विचारतात, “यापैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या फेक अनाऊन्समेंट्समुळे अनाऊन्समेंट मशिन म्हटलं जातं?” हा प्रश्न विचारल्यानंतर ते चार पर्याय सांगतात. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असे चार पर्याय होते.
बिग बी जेव्हा हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्यासमोर हॉटसीटवर बसलेला स्पर्धक मध्यप्रदेशचाच असतो. तो त्यांना दुसरा पर्याय लॉक करण्यास सांगतो. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणतात, “मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गेल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत, मात्र खरं काम काहीच केलं नाही. म्हणूनच त्यांना अनाऊन्समेंट मशिन म्हटलं जातं.” मात्र हा संपूर्ण व्हिडीओ फेक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण बिग बींचा आवाज फेक असल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओचा लिप-सिंकसुद्धा ऑडिओशी जुळत नाही. म्हणूनच सोनी टीव्हीने याविषयी स्पष्टीकरण देणारी पोस्ट लिहिली आहे.
ये कैसा सवाल पूछा जा रहा है KBC में?
क्या ये सच है कि शिवराज सिंह जी घोषणा मंत्री हैं? pic.twitter.com/jasfC809HJ
— Ritu Choudhary (@RituChoudhryINC) October 8, 2023
— sonytv (@SonyTV) October 9, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फेक क्लिपविषयी पोस्ट लिहित सोनी टीव्हीने चुकीची माहिती पसरवल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. ‘कौन बनेगा करोडपती या आमच्या शोचा एक अनधिकृत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं आम्हाला समजलं. या व्हिडीओमध्ये सूत्रसंचालकाच्या आवाजाला चुकीचा व्हॉईस ओव्हर देण्यात आला आहे. मूळ व्हिडीओतील कंटेटशी छेडछाड करण्यात आली आहे. आम्ही हे प्रकरण सायबर क्राइम सेलकडे नेणार आहोत. त्याचप्रमाणे अशा चुकीच्या पद्धतीच्या व्हिडीओवर विश्वास न ठेवण्याची विनंती आम्ही प्रेक्षकांना करतो’, असं सोनी टीव्हीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.