चेन्नई : 23 नोव्हेंबर 2023 | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सूर्याबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सूर्याचा अपघात झाला आणि या अपघातात त्याला दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर चित्रपटाच्या युनिटला ताबडतोब सतर्क करण्यात आला आहे. सध्या सूर्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूर्या त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटाचं शूटिंग करत होता. चेन्नईमध्ये या चित्रपटाची शूटिंग सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, एका सीनच्या शूटिंगदरम्यान सूर्यावर कॅमेरा पडला. यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. सध्या सूर्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूर्या हा तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. टॉलिवूडमध्ये त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो. म्हणूनच त्याचा प्रत्येक तमिळ चित्रपट हा तेलुगू भाषेतही डब केला जातो. तर ‘मक्खी’ या चित्रपटामुळे तो बॉलिवूडमध्येही लोकप्रिय झाला. सध्या तो ‘कांगुवा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शिवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. ऐतिहासिक कथानकावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये सूर्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिका साकारणार आहे. सूर्याचा हा आगामी चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल 38 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. यामधील अॅक्शन सीन्स चित्रपटाचं मुख्य आकर्षण असेल. या चित्रपटाच्या पोस्टर आणि फर्स्ट लूकला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
ऐतिहासिक कथानकावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी चेन्नईमध्ये भव्य सेट उभारण्यात आला होता. सूर्याला दुखापत झाल्यानंतर चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. सूर्याला किती गंभीर दुखापत झाली, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. कांगुवा हा सूर्याच्या करिअरमधील सर्वाधिक बजेटचा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित झाली नाही.
सूर्या हा तमिळ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मात्र त्याचा चाहतावर्ग केवळ तामिळनाडूपुरता मर्यादित नाही. तर तो जगभरात लोकप्रिय आहे. वाढदिवसानिमित्त सूर्याने त्याच्या आगामी ‘कांगुवा’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्या आणि दिग्दर्शक शिवा पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. यामध्ये सूर्यासोबतच योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला आणि आनंदराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.