मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : ‘मार्क अँटनी’ या चित्रपटात झळकलेला प्रसिद्ध तमिळ अभिनेता विशाल याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्याने ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC) म्हणजेच सेन्सॉर बोर्डावर धक्कादायक आरोप केले आहेत. विशालने सेन्सॉर बोर्डावर भ्रष्टाचाराचा आणि चित्रपटाला सर्टिफिकेटच्या बदल्यात लाच मागितल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा खुलासा विशालने केला. सेंसर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये मागण्यात आले होते, असं त्याने म्हटलंय.
या व्हिडिओच्या सुरुवातीला विशाल हे स्पष्ट करतो की, हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही. मात्र त्याच्या ‘मार्क अँटनी’ या चित्रपटाबद्दलचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला. विशालने हे सुद्धा स्पष्ट केलं की त्याच्या टीमने चित्रपटाच्या सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन अर्ज केलं होतं आणि काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना शेवटच्या क्षणी हे पाऊल उचलावं लागलं होतं.
“मुंबईतल्या सेन्सर बोर्डाच्या ऑफिसमध्ये जे घडलं ते पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या टीममधल्या एका व्यक्तीला मी सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पाठवलं होतं. त्याच दिवशी सर्टिफिकेट हवा असेल तर लाखो रुपये मोजावे लागतील असं त्याला म्हटलं गेलं. अखेर आमच्याकडे कोणताच पर्याय नव्हता,” असं विशालने सांगितलं.
‘मार्क अँटनी’ य चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला सर्टिफिकेट देण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडून साडेसहा लाख रुपये लाच मागण्यात आली, असं विशालने सांगितलं. या साडेसहा लाखांपैकी तीन लाख रुपये सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी आणि उर्वरित साडेतीन लाख रुपये सर्टिफिकेटसाठी मागण्यात आले. विशालने या व्हिडिओत पुढे व्यवहार करणाऱ्या महिलेचाही उल्लेख केला. त्याचप्रमाणे इतरांनी चित्रपट सादर केल्यानंतर चार लाख रुपये दिल्याचाही खुलासा त्याने केला. याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती विशालने या व्हिडिओद्वारे केली. तो म्हणाला, “आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. आम्ही दोन हप्त्यांमध्ये त्यांना पैसे दिले. जर सरकारी कार्यालयात अशीच परिस्थिती असेल तर मी उच्च अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो.”
विशालने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘रुपेरी पडद्यावर दाखवला जाणारा भ्रष्टाचार ठीक आहे. पण खऱ्या आयुष्यात नाही. हे मी पचवू शकत नाही. विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये आणि सेंसोर बोर्डाच्या मुंबई ऑफिसमध्ये याहूनही वाईट घडतंय. हे मी माझ्यासाठी नाही तर इतर निर्मात्यांसाठी करतोय. माझे कष्टाने कमावलेले पैसे भ्रष्टाचारात गेले हे मी सहन करू शकत नाही.’ विशालने या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांना टॅक केलं आहे. यासोबतच त्याने ज्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले त्याचीही माहिती कॅप्शनमध्ये दिली आहे. विशालच्या या व्हिडिओनंतर अनेकांनी न्यायाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार उघड केल्याने त्याचं कौतुकही केलं.