मुंबई | 8 सप्टेंबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अटलीने आपल्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांवर जबरदस्त छाप सोडली आहे. शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालता आहे. प्रदर्शनाच्या दिवशी ‘जवान’ने तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित किंग खानचं कौतुक केलं आहे. यामध्ये आता एका साऊथ सुपरस्टारचाही समावेश झाल आहे. अभिनेता महेश बाबूने ट्विट करत शाहरुख खान आणि दिग्दर्शक अटलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘जवान’ हा चित्रपट स्वत:चेच विक्रम मोडणार असल्याचा दावा त्याने केला आहे.
महेश बाबूने नुकताच ‘जवान’ हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली. ‘जवान.. ब्लॉकबस्टर चित्रपट. अटलीने किंग साइज एंटरटेन्मेंट सिनेमा खुद्द किंगसोबत दिला आहे. त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट घेऊन आला आहे. शाहरुखचं व्यक्तीमत्त्व, करिश्मा आणि स्क्रीनवरील वावर हा अतुलनीय आहे. या चित्रपटात तो अक्षरश: पेटून उठला आहे. जवान स्वत:चेच विक्रम मोडणार असं दिसतंय. ही किती छान गोष्ट आहे. या लेजंड्सच्याच (महान व्यक्तीमत्त्व असलेले) गोष्टी आहेत’, अशा शब्दांत महेशने कौतुक केलं आहे.
#Jawan… Blockbuster cinema… 💥💥💥 @Atlee_dir delivers king size entertainment with the King himself!! Comes up with his career’s best film… 👏👏👏 The aura, charisma and screen presence of @iamsrk are unmatched… He’s on fire here 🔥🔥🔥!! Jawan will break his own records……
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) September 8, 2023
शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला समिक्षकांनी चार ते पाच स्टार्स रेटिंग दिले आहेत. किंग खानसोबतच या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज आहे. नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, दीपिका पादुकोण, प्रियामणी, एजाज खान, सुनील ग्रोवर, गिरीजा ओक, लहर खान, संजीता चॅटर्जी यांच्याही भूमिका आहेत. शाहरुखने या चित्रपटाद्वारे एक नवा विक्रम रचला आहे. गोपाळकालाच्या दिवशी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये चाहत्यांनी तुफान गर्दी केली. ‘जवान’च्या कमाईसमोर ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ फिके पडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ‘जवान’ने गुरूवारी 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी देशभरात तब्बल 75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून इतकी कमाई झाली आहे. फक्त हिंदी भाषेबद्दल बोलायचं झाल्यास शाहरुखच्या ‘जवान’ने 63 ते 65 कोटी रुपये कमावले आहेत. तर तमिळ आणि तेलुगू भाषेत पाच-पाच कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच दक्षिण भारतातही शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझ पहायला मिळत आहे. शाहरुखने स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘जवान’ हा या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.