मुंबई: स्प्लिट्सविला 14 ची स्पर्धक हिबा ट्राबेल्सी (Hiba Trabelssi) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या डेटिंग रिअॅलिटी शोमध्ये हिबा तिचा परफेक्ट पार्टनर शोधतेय. यादरम्यान तिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि भारतात आल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाबद्दलची कहाणी सांगितली. भारतात आल्यानंतर मानवी तस्करीचा शिकार झाल्याची धक्कादायक घटना तिने सांगितली.
हिबाने स्प्लिट्सविला 14 या रिअॅलिटी शोमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ती मॉडेल आहे. त्यासोबतच ती अभिनयविश्वातही काम करते. हिबाने एका चित्रपटात कतरिना कैफच्या बॉडी डबलचं काम केलं होतं. एका तेलुगू चित्रपटाच्या गाण्यातही ती झळकली होती. मात्र इथपर्यंतचा तिचा प्रवास किती कठीण होता, याबद्दल हिबाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
आपल्या प्रवासाबद्दल सांगताना हिबा म्हणाली, “मी जेव्हा पहिल्यांदा भारतात माझ्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात करण्यासाठी आली, तेव्हा माझ्यासोबत मोठी घटना घडली. माझ्यासाठी तो अत्यंत वाईट काळ होता. मी मानव तस्करीची शिकार झाली होती आणि मला त्याविषयी काहीच माहीत नव्हतं. मी ज्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला, त्यानेच माझा विश्वासघात केला. मी पूर्णपणे खचले होते.”
“त्या काळात माझ्यावर खूप अत्याचार झाले. मला किडनॅप करून एका खोलीस बंद केलं होतं. तीन दिवस मला काहीच खायला-प्यायला दिलं नव्हतं. मात्र मी हार मानली नाही. त्या वाईट स्वप्नातून मी बाहेर पडले. त्या घटनेनंतर मी आणखी खंबीर झाले”, असं तिने पुढे सांगितलं.
इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल हिबा म्हणाली, “जेव्हा मी इंडस्ट्रीत कामाला सुरुवात केली तेव्हा कोणत्याही कनेक्शनशिवाय, गॉडफादरशिवाय काम मिळणं कठीण होतं. मी पूर्ण प्रयत्न करतेय आणि एकेक पाऊल पुढे ठेवतेय. मला खात्री आहे की एकेदिवशी मला यश नक्कीच मिळले.”