दिवंगत अभिनेते आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदमुरी तारका रामाराव (एनटी रामाराव) (Sr NTR) यांची कन्या उमा माहेश्वरी (Uma Maheswari) यांनी आत्महत्या केली. हैदराबादमध्ये (Hyderabad) सोमवारी दुपारी ही घटना घडली असून या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. उमा यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र तब्येतीच्या काही समस्यांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येमागे प्रकृतीशी संबंधित कारण असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. उमा यांची मुलगी दीक्षिताने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई दुपारी 12 वाजता त्यांच्या खोलीत गेल्या आणि नंतर बराच वेळ त्या बाहेर आल्या नाहीत. अखेर दुपारी अडीच वाजताच्या च्या सुमारास दीक्षिताने पोलिसांना माहिती दिली. ज्युबिली हिल्स इथल्या घरी पोहोचताच उमा त्यांच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या दिसल्या. ही घटना घडली तेव्हा घरात चार जण उपस्थित होते, असं सांगण्यात येत आहे.
या आत्महत्येप्रकरणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 174 अन्वये ज्युबिली हिल्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दु:खद बातमी कळताच एन. चंद्राबाबू नायडू, नंदामुरी कल्याण राम हे उमा माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले.
एनटी रामाराव यांच्या 12 मुलांपैकी उमा या सर्वांत लहान होत्या. उमा माहेश्वरी यांना दोन मुली आहेत. एनटी रामाराव यांना 8 मुलं आणि 4 मुली आहेत. काही दिवसांपूर्वीच उमा यांच्या एका मुलीचं लग्न झालं. या लग्नसोहळ्याला कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. अभिनेते आणि माजी मंत्री एन. हरिकृष्णा यांच्यासह एनटीआर यांच्या तीन मुलांचं यापूर्वी निधन झालं आहे.