चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, नेटकरी भडकताच अभिनेत्री म्हणाली..

| Updated on: Dec 19, 2024 | 9:25 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डेचा गेल्या महिन्यात गोव्यात लग्नसोहळा पार पडला. 2023 मध्ये जर्मनीत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यानंतर तिने बंगाली विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. यावेळी तिच्या पतीने चप्पल घालून सात फेरे घेतल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

चप्पल घालून पतीने घेतले सात फेरे, नेटकरी भडकताच अभिनेत्री म्हणाली..
श्रीजिता डे, मायकल ब्लोहम पेप
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्रीजिता डेनं गेल्या महिन्यात पती मायकल ब्लोहम पेप याच्याशी दुसऱ्यांदा लग्न केलं. गोव्यात बंगाली विवाहपद्धतीनुसार हा लग्नसोहळा पार पडला होता. जुलै 2023 मध्ये श्रीजिता आणि मायकलने जर्मनीमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. मात्र भारतीय परंपरेनुसार लग्न करण्याची श्रीजिताची इच्छा होती. यामुळेच वर्षभरानंतर दोघांनी पुन्हा एकदा लग्न केलं. 10 नोव्हेंबर रोजी हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मेहंदी, संगीत, हळद आणि बंगाली विवाहपद्धतीनुसार लग्न.. असा हा साग्रसंगीत सोहळा पार पडला होता. मात्र त्यातील एक गोष्ट नेटकऱ्यांना खूप खटकली होती. ती म्हणजे सात फेरे घेताना श्रीजिताच्या पतीने पायात चप्पल घातले होते. यावरून नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोलिंगवर आता श्रीजिताने उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या लग्नाच्या फोटोंमध्ये मायकलच्या पायात मोजडी दिसून येत आहेत. पायात मोजडी घालूनच तो श्रीजितासोबत सात फेरे घेताना दिसून येत आहे. आता ‘फिल्मीग्यान’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत पतीची बाजू घेत श्रीजिता म्हणाली, “जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा चप्पल बाहेरच काढतो. पण जेव्हा चर्चमध्ये जातो, तेव्हा आपण चप्पल बाहेर काढत नाही. ईश्वर तर दोन्ही जागी आहे. अग्नी आणि सात फेऱ्यांबद्दलचा आदर हा मनात असला पाहिजे. चप्पल घातल्याने किंवा कपड्यांवरून हा आदर दाखवला जात नाही.”

हे सुद्धा वाचा

याविषयी ती पुढे म्हणाली, “बंगाली विवाहपद्धतीत नवरा खरंतर शेरवानीसुद्धा घालत नाही. त्याऐवजी तो खादी किंवा सुती कपड्याची धोती परिधान करतो. याचा अर्थ हाच आहे की कपड्यांवरून एखाद्या संस्कृतीबद्दलचा आदर दाखवला जाऊ शकत नाही. आदर हा मनात असला पाहिजे.” श्रीजिताने तिची बाजू मांडली असली तरी काही नेटकरी त्यावरूनही तिला ट्रोल करत आहेत. ‘आधी चुकीचं वागा आणि नंतर त्याच गोष्टीला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करा’, असं एकाने म्हटलंय. तर ‘आदर मनात असला तरी संस्कृतीसुद्धा महत्त्वाची ठरते. अन्यथा लोकांनी बिकिनी किंवा काळ्या कपड्यांमध्ये लग्न केलं असतं’, असं दुसऱ्याने लिहिलंय.