दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या चित्रपटात पौराणिक थीम्स जरी दिसत असले तरी ते स्वत: देवावर फार विश्वास ठेवत नाहीत. ‘बाहुबली’, ‘RRR’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक राजामौली यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की ते नास्तिक आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंगदेखील सांगितला. त्या अत्यंत कठीण परिस्थितीतही देवाचा आधार घेतला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘मॉडर्न मास्र्टर्स: एस. एस. राजामौली’ हा माहितीपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यात त्यांनी ही घटना उलगडून सांगितली आहे.
आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी माझ्या नास्तिकतेवर त्याचा काही परिणाम झाला नाही आणि मी दैवी शक्तींवर विश्वास करू लागलो नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. एका दुर्गम ठिकाणी राजामौली यांची पत्नी रमा राजामौली यांचा भीषण अपघात झाला होता. याच अपघाताचा प्रसंग त्यांनी या मुलाखतीत सांगितला. रामचरण आणि काजल अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘मगधीरा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात झाला होता.
“त्या अपघातानंतर मी स्तब्ध झालो होतो. मला जोरजोरात रडू कोसळत होतं. मला माहित असलेल्या प्रत्येक डॉक्टरांशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो. त्या अपघातात माझ्या पत्नीच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता आणि धक्क्याने तिच्या पाठीच्या खालच्या भागाला अर्धांगवायू झाला होता. घटनास्थळापासून सर्वांत जवळचं रुग्णालय हे 60 किलोमीटर अंतरावर होतं. मी प्रचंड घाबरलो होतो. त्यावेळी माझ्या नकळत डोक्यात विचार येऊन गेला की, माझ्या मदतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतोय का? पण मी तसं केलं नाही. मी फक्त वेड्यासारखा रडत होतो आणि सतत डॉक्टरांना कॉल करत होतो. त्या परिस्थितीत जे करणं गरजेचं होतं, ते मी करत होतो. माझ्या मते आयुष्याच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर मी कर्मयोग हा माझा जीवनमार्ग म्हणून निवडला. माझं काम हाच माझा देव आहे. सिनेमासाठी माझ्या मनात खूप आदर आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.
नेटफ्लिक्सच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांचे वडील आणि लेखक व्ही. विजयेंद्र प्रसादसुद्धा सहभागी झाले होते. राजामौली जरी नास्तिक असले तरी बाकी संपूर्ण कुटुंब आस्तिक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे राजामौली यांचा जरी धार्मिक गोष्टींवर विश्वास नसला तरी अध्यात्मिकतेकडे झुकलेल्या कुटुंबात कधीही त्यामुळे समस्या निर्माण झाल्या नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. “नास्तिक असणाऱ्या लोकांमध्ये उच्च पातळीची नैतिकता असणं आवश्यक असतं. अशा व्यक्तींबद्दल मला खूप आदर आहे”, असं ते म्हणाले.