मुंबई- एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप मोठं यश मिळवलं. या चित्रपटाने जगभरात जवळपास 1100 कोटी रुपयांची कमाई केली. एकीकडे ऑस्कर या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी RRR ची चर्चा होत असतानाच आता राजामौलींनी मोठी घोषणा केली आहे. RRR च्या चाहत्यांसाठी त्यांनी आनंदाची बातमी सांगितली आहे. RRR या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून राजामौली यांचे वडील त्याच्या कथेवर सध्या काम करत आहेत.
RRR या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीसुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. राजामौली यांचे वडील आणि पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद हे सीक्वेलची कथा लिहित आहेत.
शिकागोमध्ये पार पडलेल्या RRR च्या स्क्रीनिंगदरम्यान राजामौलींना सीक्वेलबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मी सीक्वेलविषयी सध्या फार काही माहिती देऊ शकत नाही. पण एवढं नक्कीच सांगू शकतो की माझे वडील, ज्यांनी RRR सह आतापर्यंत माझ्या प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, त्यांच्यासोबत मी यावर चर्चा केली आहे. ते सध्या कथेवर काम करत आहेत.”
SSR when asked about RRR2 ?
SSR – I cant reveal anything about it now. My father is working on #RRR2 story ?@AlwaysRamCharan @tarak9999 pic.twitter.com/mBHsXkFGIV
— ℝ???? ? ℝℂ ? (@im_RCult) November 13, 2022
RRR चा सीक्वेल येणार हे कळताच तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. 2017 मध्ये ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ प्रदर्शित झाला. त्यानंतर RRR हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी राजामौलींनी पाच वर्षे मेहनत केली.
देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ RRR या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.