एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचले. केवळ भारतीयच नाही तर हॉलिवूड अभिनेत्यांकडूनही या चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. ‘द वॅम्पायर डायरीज’चा (The Vampire Diaries) अभिनेता जोसेफ मॉर्गन (Joseph Morgan) आणि त्याची पत्नी-अभिनेत्री पर्शिया व्हाइट यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला. हे दोघं RRR च्या अक्षरश: प्रेमात पडले आहेत. जोसेफने ट्विट करत या चित्रपटाचं कौतुक केलं. ‘थोडा फावला वेळ मिळाला, तेव्हा मी आणि पर्शियाने मिळून RRR आणि एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स हे दोन अप्रतिम चित्रपट पाहिले. दोन्ही चित्रपटांनी मी भारावून गेलो. आम्ही हसलो, रडलो आणि आश्चर्यचकित झालो. जबरदस्त सिनेमा’, अशा शब्दांत त्याने स्तुती केली.
जोसेफच्या या ट्विटवर एका चाहत्याने लिहिलं, ‘RRR पाहण्यासाठी धन्यवाद’. त्यावर उत्तर देताना जोसेफने म्हटलं, ‘सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही एक परिपूर्ण कलाकृती होती. चित्रपट पाहिल्यापासून मी त्याचा विचार करत आहे.’ RRR या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याचप्रमाणे आलिया भट्ट आणि अजय देवगणसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
Had a bit of time off shooting and @RealPersiaWhite and I watched two incredible movies. “RRR” & “Everything Everywhere All At Once” Both were astounding. We laughed and cried and gasped in amazement. Just stunning cinema.
— Joseph Morgan (@JosephMorgan) June 28, 2022
जोसेफने केलेल्या या कौतुकाबद्दल RRR चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याचे आभार मानण्यात आले. त्यावरही पुन्हा जोसेफ प्रतिक्रिया देत म्हणाला, ‘मला खरंच हा चित्रपट खूप आवडला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मजा आली.’ एखाद्या हॉलिवूड कलाकाराकडून RRR या चित्रपटाचं कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. कॉमिक बुक्स बॅटमॅन बियाँड आणि कॅप्टन अमेरिकाचे लेखक जॅक्सन लेंझिंग यांनीसुद्धा ट्विट करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं.
It was an absolute masterpiece, from start to finish. I’ve been thinking about it ever since. https://t.co/1WfBAlJuuF
— Joseph Morgan (@JosephMorgan) June 28, 2022
‘माझे काही मित्र रात्री माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला RRR पाहण्याचा आग्रह केला. आता हा चित्रपट पाहिल्यानंतर मी पूर्णपणे, खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा चाहता झालो आहे. मी पाहिलेला हा सर्वात विलक्षण, सर्वात प्रामाणिक आणि ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. मला खात्री आहे की जेस आणि मी या आठवड्यात तो पुन्हा पाहू,’ असं डॉक्टर स्ट्रेंजचे पटकथालेखक रॉबर्ट सी. कारगिल यांनी म्हटलं होतं.
I really loved it. Just a joy from start to finish. https://t.co/rloViHz6KE
— Joseph Morgan (@JosephMorgan) June 28, 2022
RRR ने तब्बल 1100 कोटींचा गल्ला जमवला होता. हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणार्या भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशनने मिडसीझन अवॉर्ड्ससाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी RRRला नामांकन दिलं. भारतीय चित्रपटाला हा बहुमान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.