मुंबई: ‘मुलगी झाली हो’ ( mulgi zali ho) या मालिकेतील महिला कलाकारांनी काल किरण माने ( kiran mane) यांच्यावर आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर किरण मानेंनी आज माध्यामांसमोर येत आपली बाजू मांडली. ‘माझ्यावर केलेले आरोप जर खरे होते तर ते समोर आणायला एवढा वेळ का लागला? मी चुकीचं वागलो तेव्हाचं मला काढून टाकायला हवं होतं. ते आतापर्यंत का थांबले होते’, असा सवाल त्यांनी विचारला. सोबतच ‘माझ्यावर आरोप करणारे कलाकार भाजप (bjp) आणि मनसेशी (mns) संबंधित असल्याने माझ्यावर आरोप केले जात आहेत, असाही गंभीर आरोप किरण माने यांनी केला आहे.
किरण माने काय म्हणाले?
किरण माने यांनी आज माध्यामांसमोर आपली बाजू मांडत अनेक आरोप केले आहेत. ‘माझ्यावर आरोप करणाऱ्या एका महिला कलाकाराचे पती उन्नी पिल्लाई हे वरळी भाजपचे पदाधिकारी आहेत. आणि अभिनेत्री शर्वनी पिल्ले या मनसेच्या चित्रपट सेनेच्या सभासद आहेत. त्यामुळे एखादा राजकीय पक्ष माझ्या विरोधात उभा राहिला तर ते का होत आहेत, याचा विचार लोकांनी करावा. या आरोपांची स्क्रिप्ट कशी तयार झाली असेल हे पण बघा’, असा आरोप मानेंनी केला आहे. ‘माझ्यावर केलेले आरोप जर खरे होते तर ते समोर आणायला एवढा वेळ का लागला? मी चुकीचं वागलो तेव्हाचं मला काढून टाकायला हवं होतं. ते आतापर्यंत का थांबले होते?’, असा सवाल विचारत त्यांनी विचारला.
मालिकेतील इतर कलाकारांचं मत काय
या सगळ्या प्रकरणाबाबत ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील कलाकारांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी साताऱ्यात ज्या ठिकाणी या मालिकेचं चित्रीकरण होतंय, त्या ठिकाणी टीव्ही 9 मराठीची टीम गेली. यावेळी बोलताना काही कलाकारांनी किरण माने यांनी आपल्याला त्रास दिला असल्याचा आरोप केला. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकर यांनी, ‘माने सतत टोमणे मारायचे, अपशब्द वापरायचे’, असा आरोप केलाय. तर काहींनी किरण माने ही चांगली व्यक्ती आहे, असं म्हटलंय. तर काही सहकलाकारांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. “किरण माने हे एक चांगली व्यक्ती आहेत. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर तरी कधीच शिवी दिलेली नाही, असं या कलाकारांनी म्हटलंय.
नेमका वाद काय आहे?
स्टार प्रवाहवरच्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील ही भूमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण माने यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. आपण ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांनी केला. त्यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
संबंधित बातम्या