श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 2023 मधील सुपरहिट ‘ॲनिमल’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने 63.8 कोटी रुपये तर शाहरुख खानच्या ‘पठाण’ने 57 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘स्त्री 2’ने पहिल्याच दिवशी तब्बल 64.8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बुधवारी संध्याकाळीही या चित्रपटाचे काही शोज होते. त्यानंतर गुरूवारी देशभरातील थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानुसार बुधवारी 9.4 कोटी आणि गुरुवारी 55.4 कोटी रुपयांची कमाई झाली.
अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाईने सुरुवात करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. याआधी जानेवारी महिन्यात हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाने 24.6 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने 95 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र ही कमाई हिंदी, तेलुगू, तमिळ अशा विविध भाषांमध्ये मिळून झाली होती.
‘स्त्री 2’चे गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये 1200 शोज होते. तर मुंबईत 1103 शोज होते. सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाल्याने या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. त्याचप्रमाणे लाँग वीकेंड असल्याने यापुढेही चांगली कमाई होईल, अशी शक्यता चित्रपट व्यापार विश्लेषकांनी वर्तवली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री 2’ची टक्कर दोन चित्रपटांशी होत आहे. जॉन अब्राहमचा ‘वेदा’ आणि अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ हे दोन्ही चित्रपटसुद्धा थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेदा’ने फक्त 6.52 कोटी रुपये कमावले आहेत. तर ‘खेल खेल में’ हा चित्रपटसुद्धा फक्त 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवू शकला.
‘स्त्री 2’ या चित्रपटात श्रद्धा कपूर, राजकुमार राव यांच्यासोबतच अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी यांच्याही भूमिका आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’चा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागालाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.