Stree 2 चित्रपटाच्या कोरिओग्राफरला अटक, लैंगिक छळ केल्याचा आरोप

| Updated on: Sep 20, 2024 | 6:45 PM

प्रसिद्ध दक्षिण भारतीय कोरिओग्राफर जानी मास्टर यांच्यावर गुरुवारी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला असून याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात जानी मास्टर यांना गोव्यातून अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Stree 2 चित्रपटाच्या कोरिओग्राफरला अटक, लैंगिक छळ केल्याचा आरोप
Follow us on

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा चित्रपट स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेत आहे. सिनेमाने चांगली कमाई देखील केली आहे. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. पण एकीकडे चित्रपटाला यश मिळत असताना दुसरीकडे पोलिसांनी माहिती दिली की, स्त्री 2 मध्ये काम केलेले प्रसिद्ध दक्षिण भारतीय कोरिओग्राफर जानी मास्टर यांच्यावर त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ज्यामुळे त्यांना आज अटक करण्यात आलीये. जानी मास्टरला सायबराबाद पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

अनेक तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केलेल्या जानी मास्टरचे खरे नाव शेख जानी बाशा असे आहे. अटक केल्यानंतर जानी मास्टरला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. महिलेच्या तक्रारीच्या आधारे सायबराबादमधील रायदुर्गम पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांच्या पत्रकात म्हटले आहे की, 15 सप्टेंबर रोजी नरसिंगी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376(2)(एन), 506, 323 अंतर्गत पुन्हा गुन्हा दाखल केला. २०२० साली मुंबईत काम करत असताना जानी मास्टरने तिचा लैंगिक छळ केला आणि बराच काळ हा प्रकार सुरू होता. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी त्याने दिली होती, असा आरोप तक्रार करणाऱ्या महिलेने केला आहे.

जबाब नोंदवल्यानंतर ही महिला कथित गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचे उघड झाले. त्यामुळे जानी मास्टरवर POCSO कायदा, 2012 चे एक कलम देखील जोडण्यात आले आहे. तेलगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने स्थापन केलेल्या एका पॅनेलनेही जानी मास्टर यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे. तम्मरेड्डी भारद्वाज म्हणाले की, पॅनेलला पीडितेकडून तक्रार मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत या मुद्द्यावर अहवाल सादर करावा लागेल.

फिल्म चेंबरने स्थापन केलेल्या लैंगिक छळ समितीचे प्रमुख असलेले प्रसाद म्हणाले की, तेलुगू फिल्म अँड टेलिव्हिजन डान्सर्स अँड डान्स डायरेक्टर्स असोसिएशनला पत्र पाठवण्यात आले असून, जानी मास्टर यांना जोपर्यंत मुक्त केले जात नाही तोपर्यंत त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात येईल. असे म्हटले आहे.

तेलंगणा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नरेला शारदा यांनी बुधवारी सांगितले की, या प्रकरणातील तक्रारदाराने आयोगाकडे संपर्क साधला आहे. तक्रारदाराला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले जातील. आयोग तिला पॅनेलकडून आवश्यक मदत करेल.