सुनिधी चौहान ही देशातील सर्वांत लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने गायनाला सुरुवात केली. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने फक्त हिंदीतच नाही तर इतरही भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. पॉप, रॉक, क्लासिकल, सेमी क्लासिकल अशा विविध जॉनरमध्ये तिने सुपरहिट गाणी गायली आहेत. करिअरच्या बाबतीत सुनिधी यशस्वी ठरली असली तरी खासगी आयुष्यात तिला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी सुनिधीच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले होते. कारण त्यावेळी सुनिधीने आंतरधर्मीय लग्न करण्याचं ठरवलं होतं.
2002 मध्ये सुनिधीने कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक बॉबी खानशी लग्न केलं होतं. कामानिमित्त दोघांची भेट झाली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट लग्न करण्याचं ठरवलं होतं. जेव्हा सुनिधीने बॉबीशी लग्न केलं, तेव्हा तो तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा होता. सुनिधीच्या कुटुंबीयांना हे नातं मान्य नव्हतं. बॉबी सुनिधीसाठी योग्य मुलगा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी लग्नाला विरोध केला होता. मात्र कुटुंबीयांचं न ऐकता सुनिधीने मुस्लीम मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तेव्हा घरच्यांनी तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते.
बॉबी खानशी लग्न केल्यानंतर वर्षभरातच त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या. अखेर दोघं लग्नाच्या एका वर्षातच विभक्त झाले. घटस्फोटानंतर कुटुंबीयांनी सुनिधीचा स्वीकार केला आणि त्यानंतर गायिकेनं तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं. घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर सुनिधी संगीतकार हितेश सोनिकच्या प्रेमात पडली. या दोघांनी दोन वर्षांपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाच्या सहा वर्षांनंतर सुनिधीने मुलाला जन्म दिला. “मी सगळ्या समस्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करते. आता मला त्या गोष्टींचा त्रास होत नाही. माझ्या कठीण काळात माझ्या आईवडिलांनी खूप साथ दिली”, अशी प्रतिक्रिया सुनिधीने एका मुलाखतीत दिली होती.
वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत सुनिधीने पार्श्वगायिका म्हणून 300 गाणी गायली होती. जवळपास देशातील आघाडीचे गायक, संगीतकार, गीतकार या सर्वांसोबत तिने काम केलंय. सुनिधी सध्या तिच्या करिअरच्या शिखरावर आहे. तिची गाणी प्रदर्शित होताच सुपरहिट ठरतात. सुनिधीचे लाइव्ह कॉन्सर्ट सोशल मीडियावर तुफान चर्चेत असतात.