Suniel Shetty | फिल्म इंडस्ट्रीने आपला आवाज गमावलाय; सुनील शेट्टीने बॉलिवूडवर साधला निशाणा

| Updated on: Oct 09, 2023 | 3:56 PM

लसुनील शेट्टी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि साधेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा नवीन शो आजपासून सुरू झाला आहे. यामध्ये ते संजय दत्तसोबत कुकींग करताना दिसणार आहेत. यासोबतच ते बॉलिवूड इंडस्ट्री आणि त्याचं बदललेलं रुप याविषयीही मोकळेपणे व्यक्त झाले.

Suniel Shetty | फिल्म इंडस्ट्रीने आपला आवाज गमावलाय; सुनील शेट्टीने बॉलिवूडवर साधला निशाणा
Suniel Shetty
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : अभिनेते सुनील शेट्टी सध्या त्यांच्या ‘स्टार वर्सेस फूड सर्वाइवल’ या शोमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये अभिनेता संजय दत्तने हजेरी लावली. या एपिसोडमध्ये सुनील शेट्टी आणि संजय दत्त मिळून जंगलमध्ये विविध आव्हानांचा सामना करत विविध पदार्थ बनवताना दिसणार आहेत. या शोमध्ये सुनील शेट्टी हे संजूबाबासोबतची आपली मैत्री आणि फिटनेससोबतच इतर मुद्द्यांवरही मोकळेपणे व्यक्त झाले. त्यासोबत त्यांनी आत्ताच्या काळातील बॉलिवूड इंडस्ट्रीतील वातावरणाबद्दलही आपलं मत मांडलं. “बॉलिवूडमध्ये पहिल्यासारखी एकता राहिली नाही. या इंडस्ट्रीने आपला आवाज गमावलाय”, असं स्पष्ट मत सुनील शेट्टी यांनी मांडलंय.

संजू बाबासोबतची मैत्री

संजय दत्तसोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना सुनील शेट्टी म्हणाले, “फार कमी जणांना ही गोष्ट माहिती असेल की संजयनेच मला अण्णा हे नाव दिलं. आम्ही ‘कांटे’ या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. त्यावेळी माझा स्टाफ मला अण्णा म्हणून हाक मारायचा. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. तेव्हापासून संजयनेही मला अण्णा म्हणूनच हाक मारायला सुरुवात केली. 9/11 ची घटना जेव्हा घडली तेव्हा आम्ही दोघं लॉस अँजेलीसमध्ये उतरलो होतो. आम्हाला युनिटसोबतच थांबायचं होतं. कुठेही बाहेर न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. तो काळ फार कठीण होता. कारण आमच्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं जात होतं. मात्र त्या काळात आम्ही दोघं एकमेकांसोबत खंबीरपणे उभे राहिलो. तेव्हापासून आत्तापर्यंत आमची मैत्री तितकीच भक्कम आहे.”

बदललेली बॉलिवूड इंडस्ट्री

बॉलिवूड इंडस्ट्रीतील बदललेल्या वातावरणाबद्दल ते पुढे म्हणाले, “आज इंडस्ट्रीने आपला आवाज गमावला आहे. बॉलिवूडबद्दल जे काही मूर्खपणाचं म्हटलं जातं त्याच्याविरोधात कोणीच उभं राहत नाही. आपल्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती बोट दाखवून प्रश्न करतो, तेव्हा कोणीच बोलायला तयार नसतं. एकमेकांमधील ते समजुतदारपणाचं नातं आणि ती एकता आज मला कुठेच दिसत नाही. बॉलिवूडचा आवाज दाबला गेला आहे. प्रत्येक गोष्ट आता फार कमकुवत झाल्यासारखं वाटतं. कारण कोणीच कोणाची मदत करायला येत नाही. पण आता खरंच आपल्याला एकत्र येण्याची खूप गरज आहे.”

हे सुद्धा वाचा

आताच्या पिढीचे कलाकार

आत्ताच्या पिढीच्या कलाकारांबद्दलही त्यांनी मत मांडलं. सेलिब्रिटींचे एजन्सी त्यांना एकटं राहायला सांगतात. मात्र हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं सुनील शेट्टी म्हणाले. “एजन्सी त्यांना ठराविक पद्धतीने राहायला, वागायला किंवा दररोज सोशल मीडियावर काहीतरी पोस्ट करायला सांगते. पण अशाने काही होत नाही. फिल्म फॅमिली ही सुद्धा तुमची फॅमिलीच असते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीलाही तुम्हाला कुटुंबासारखाच समजावं लागतं”, असं ते पुढे म्हणाले.