कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये सहा वर्षांनंतर सुनील ग्रोवरची एण्ट्री झाली. कपिलसोबत वाद झाल्यानंतर त्याने हा शो सोडला होता. आता पुन्हा एकदा सुनीलला कपिलच्या शोमध्ये पाहून चाहते खुश झाले आहेत. मात्र शोमधील सुनील ग्रोवरचा अवतार आणि त्यात होणारी कॉमेडी ही प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पालला अजिबात पसंत पडत नाहीये. सुनील ग्रोवरच्या पोशाखावर आणि भूमिकेवर टीका करत असतानाच त्याने नेटफ्लिक्सवरही निशाणा साधला आहे. नेटफ्लिक्सवर सतत आक्षेपार्ग आणि अश्लील कंटेट दाखवला जातो, त्यामुळे कपिलने या प्लॅटफॉर्मची निवड करायला पाहिजे नव्हती, असं तो म्हणाला आहे.
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चे काही एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर त्याचा पहिला सिझन संपुष्टात आला आहे. याविषयी सुनील पालने आनंद व्यक्त केला. त्याप्रमाणे शोमध्ये पुरुषांना स्त्रियांच्या वेशात सादर करणं चुकीचं असल्याचं त्याने म्हटलंय. सुनील ग्रोवरच्या कॉमेडीचा तिटकारा करत तो म्हणाला, “सुनील साडी नेसून स्त्रियांसारखं अभिनय करतो आणि लोकांच्या कुशीत जाऊन बसतो. हे सर्व मला खूप तुच्छ वाटतं. स्त्रियांचे कपडे परिधान करणं आणि आक्षेपार्ह बोलणं, हे सर्व चांगलं नाही वाटतं. मला हे सर्व खूपच तुच्छतेचं वाटतं. महिला इतक्या आसुसलेल्या नसतात जितकं सुनील त्यांना दाखवतो. कपिलच्या शोमध्ये हे सर्व दाखवण्याऐवजी खरी कॉमेडी दाखवायला पाहिजे.”
सुनील पालने असंही म्हटलंय की नेटफ्लिक्स हे अडल्ट आणि अश्लील कंटेटसाठी ओळखला जातो आणि या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की कपिल शर्माला नेटफ्लिक्सने त्यांचा शो या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्याचं आमिष कसं दाखवलं? “कपिल हा ओटीटी आर्टिस्ट नाही तर टीव्ही आर्टिस्ट आहे. नेटफ्लिक्सवर बहुतांश हिरो हे कामुक दाखवले जातात. त्यांना प्रतिभावान लोक नको आहेत. 40 लेखक असूनही ते या शोमध्ये नवीन काहीच करू शकले नाहीत. शोमधील सर्व लोक थकलेले आणि कोणताही उत्साह नसल्यासारखे दिसतात. त्या शोमध्ये कोणालाच सुनील ग्रोवरला पाहायचं नाही, प्रत्येकाला कपिल शर्मालाच पाहायचं आहे. कपिलने टीव्हीवर परत यावं,” असंही मत त्याने मांडलं आहे.