अभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडिया ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी होती. 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुनाह’ या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री सुजाता मेहतानंही काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुजाताने सनी आणि डिंपलच्या प्रेमकहाणीविषयी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. सनी आणि डिंपल त्यांच्या रिलेशनशिपविषयी मनमोकळे होते, असं तिने सांगितलंय. सार्वजनिक ठिकाणीही त्यांनी कधी नात्याला लपवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या या मुलाखतीत सुजाता त्या दोघांच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.
“मी त्यांच्यासोबत गुनाह या चित्रपटात काम केलं होतं. त्या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती आणि दोघंही माझे खूप चांगले मित्र होते. आम्ही एकत्र काम करत असल्याने त्यात लपवण्यासारखं काहीच नव्हतं. आमच्या कामात, माझ्या मते सर्वकाही प्रोफेशनल असतं. सगळी लोकं आपापलं काम करतात आणि निघून जातात. गुनाह चित्रपटाच्या सेटवरही जेव्हा आम्ही शूटिंगसाठी जायचो, तेव्हा दोघांमध्ये खूप चांगली ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री दिसून यायची. दोघांचं एकत्र येणं हे त्यांच्या नशीबातच होतं”, असं सुजाता म्हणाल्या.
याविषयी बोलताना त्यांनी पुढे सांगितलं, “राजेश खन्ना यांच्या ‘जय जय शिवशंकर’ या चित्रपटासाठी सर्वांत आधी मलाच मुख्य नायिका म्हणून निवडलं होतं. मात्र नंतर माझी जागा डिंपलने घेतली. हा बदल राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं नातं वाचवण्यासाठी एक प्रयत्न म्हणून करण्यात आला होता. दोघंही विभक्त होण्याच्या मार्गावर होते आणि त्यांच्या मुलांना दोघांना एकत्र पाहायचं होतं. त्याचप्रमाणे त्यावेळी राजेश खन्ना यांच्या करिअरलासुद्धा उतरती कळा लागली होती. मी राजेश खन्ना यांना जेव्हा एअरपोर्टवर पाहिलं होतं, तेव्हा मला त्यांची निराशा स्पष्टपणे जाणवत होती. दुर्दैवाने तो चित्रपट कधी पूर्ण होऊ शकला नाही.”
1987 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत डिंपल कपाडियाने खुलासा केला होता की राजेश खन्ना यांनी कधीच तिचं कौतुक केलं नव्हतं. “मी जिथे कुठेही जायची, तिथे लोक माझं कौतुक करायचे. पण राजेश खन्ना यांच्या तोंडून मी कधी कौतुकाचा एक शब्दही ऐकला नव्हता. जणू त्यांनी माझ्याकडे नीट पाहिलंच नव्हतं. मी नेहमीच त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहायची, पण त्यांच्याकडून कधीच काही ऐकायला मिळालं नाही. त्यांना जे हवंय ते करण्यात आणि त्यांचा होकार मिळवण्यातच माझे सगळे प्रयत्न गेले. हे सर्व जणू एखादी शिडी चढण्यासारखं होतं. मी कितीही पायऱ्या चढल्या तरी अजून बराच प्रवास बाकी होता, असं वाटायचं”, अशा शब्दांत डिंपल व्यक्त झाली होती.