मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाची तुफान क्रेझ अजूनही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. म्हणूनच रक्षाबंधननिमित्त पुन्हा एकदा थिएटरमध्ये सिनेरसिकांनी गर्दी केली. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नुकतेच थिएटरमध्ये वीस दिवस पूर्ण केले आहेत. विसाव्या दिवशी ‘गदर 2’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. सुट्टीचा दिवस असल्याने हा चित्रपट पाहण्याची संधी अनेकांनी सोडली नाही. म्हणूनच प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशी या चित्रपटाने 19 व्या दिवसापेक्षा दुप्पट कमाई केली आहे. सनी देओलच्या या चित्रपटाने आता शाहरुख खानच्या ‘पठाण’ आणि प्रभासच्या ‘बाहुबली 2’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. विसाव्या दिवशी या दोन्ही चित्रपटांची कमाई फार कमी होती. मात्र दुसरीकडे ‘गदर 2’ला अजूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं होतं. म्हणूनच तब्बल 22 वर्षे उलटल्यानंतरही प्रेक्षकांना त्याच्या सीक्वेलविषयी फार उत्सुकता होती. प्रदर्शनाच्या विसाव्या दिवशी ‘गदर 2’ने जवळपास दहा कोटी रुपये कमावले आहेत. ही कमाई 19 व्या दिवसापेक्षा दुप्पट आहे. आता तिसऱ्या आठवड्यात कमाईचा एकूण आकडा 500 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने विसाव्या दिवशी फक्त 4.20 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसरीकडे प्रभासच्या ‘बाहुबली 2’ने विसाव्या दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. या दोन्ही आकड्यांना सनी देओलच्या ‘गदर 2’ने मागे टाकलं आहे. चित्रपट निर्मात्यांनी रक्षाबंधनचं औचित्य साधत प्रेक्षकांना खास भेट दिली होती. त्याचाच फायदा चित्रपटाच्या कमाईत झाला. ‘गदर 2’च्या दोन तिकिटांसोबत आणखी दोन तिकिटं मोफत दिली आहे. ही ऑफर येत्या 3 सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे वीकेंडला कमाईचा आकडा आणखी वाढू शकतो.
‘गदर 2’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर स्वातंत्र्यदिनी तब्बल 55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. आतापर्यंत या चित्रपटाने देशभरात जवळपास 460 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सनी देओलला बऱ्याच वर्षांनंतर बॉक्स ऑफिसवर एवढं मोठं यश मिळालं आहे.