मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेण्यात आली आहे. बँक ऑफ बरोडाने एका निवेदनाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी लिलावाची प्रक्रिया पार पडणार होती. 56 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल यांचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. सनी देओल हे डिसेंबर 2022 पासून बँक ऑफ बरोडाच्या 55.99 कोटी रुपयांच्या कर्जाचे थकबाकीदार आहेत. ‘अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांच्या बंगल्याच्या विक्री संदर्भातील लिलावाची नोटीस काही तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आली आहे’, असं बँकेनं निवेदनात स्पष्ट केलं आहे.
बँकेनं रविवारी सांगितलं होतं की ‘सनी व्हिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुहू इथल्या या बंगल्याचा लिलाव 51.43 कोटी रुपयांपासून सुरू केला जाईल. तर लिलावाच्या बोलीची किमान रक्कम 5.14 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. या व्यतिरिक्त सनी साऊंड्स या 599.44 चौरस मीटरच्या मालमत्तेचाही लिलाव होणार होता. सनी साऊंड्स ही देओल कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी आहे. ही कंपनी कर्जासाठी कॉर्पोरेट गॅरेंटर होती. तर सनी देओल यांचे वडील धर्मेंद्र हे वैयक्तिक हमीदार आहेत.
रविवारी बजावलेल्या नोटिशीत असं म्हटलं गेलं होतं की, 2002 च्या SARFAESI कायद्याच्या तरतुदींनुसार लिलाव होण्यापासून रोखण्यासाठी देओल कुटुंबीय अजूनही बँकेकडे त्यांच्या थकित कर्जाची पुर्तता करू शकतात. बँकेनं लिलावासंदर्भातील नोटीस बजावल्यानंतर 24 तासांत आपला निर्णय बदलला आहे. ‘सनी व्हिला’ या बंगल्याच्या लिलावाला स्थगिती दिली आहे.
सनी देओलचा ‘गदर 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरत आहे. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 300 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने हृतिक रोशनच्या ‘वॉर’, सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनचा आकडा पार केला आहे.