Sunny Deol | “त्या गोष्टीचा मोठा धक्का..”; बंगल्याच्या लिलावाबद्दल सनी देओलने सोडलं मौन

| Updated on: Aug 30, 2023 | 8:33 PM

'सनी व्हिला' या बंगल्याचा लिलाव होणार होता, मात्र 24 तासांत बँकेने लिलावाची नोटीस मागे घेतली. याप्रकरणी आता सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्या गोष्टीचा मोठा धक्का बसला, याविषयी तो व्यक्त झाला.

Sunny Deol | त्या गोष्टीचा मोठा धक्का..; बंगल्याच्या लिलावाबद्दल सनी देओलने सोडलं मौन
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेता सनी देओलने ‘गदर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर राजकारण सोडण्याचा निर्णय जाहीर केला. याशिवाय त्याने चित्रपट निर्मित करणंही बंद केलं आहे. सनी देओलने खुद्द सांगितलं की त्याची कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. यादरम्यान त्याचा स्वत:चा बंगलाही हातून जाता-जाता वाचला. बँक ऑफ बरोडाने सनीच्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस छापली होती. त्यानंतर 24 तासांतच लिलावाचा निर्णय मागे घेण्यात आला. या वृत्ताने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. राजकीय क्षेत्रातूनही त्यावर प्रतिक्रिया आल्या होत्या. आता सनी देओलने त्यावर मोकळेपणे भाष्य केलं आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे सर्वात मोठा धक्का बसला, याविषयी त्याने सांगितलं.

“मला सर्वांत जास्त दु:ख या गोष्टीचं झालं की…”

सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव होणार होता. मात्र ऐनवेळी त्याने ‘सनी व्हिला’चा लिलाव होण्यापासून थांबवलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओल म्हणाला, “मी या गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही, कारण मला माहीत आहे की मी कोणत्या समस्यांचा सामना केला आहे. त्या समस्येचं समाधान मी स्वत:च शोधलं. मात्र याप्रकरणी मला सर्वांत जास्त दु:ख या गोष्टीचं झालं की त्यांनी वर्तमानपत्रात लिलावाची नोटीस छापली. त्याने काय साध्य होणार होतं?”

“माझ्या चाहत्यांना दुखावण्याची काय गरज होती?”

“या माझ्या समस्या आहेत. याप्रकरणी माझ्या चाहत्यांना दुखावण्याची काय गरज होती? काही लोकं या सर्व गोष्टींची मजा घेत होते. जेव्हा एखादा व्यक्ती बिझनेस करतो, तेव्हा त्यात नुकसान सुद्धा होऊ शकतं आणि नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रॉपर्टी असते. ही माझी आणि माझ्या वडिलांच्या मेहनतीची कमाई आहे. कोणीच निराश होऊ नये म्हणून मी चाहत्यांना इतकंच म्हणतो की, सर्वकाही ठीक आहे”, असं तो पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

बँक ऑफ बडोदाकडून घेतलं होतं कर्ज

सनी देओलने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतलं होतं. मात्र त्या कर्जाची परतफेद केली नाही. त्यामुळे त्याच्यावर 56 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी 25 सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी 51 कोटी 43 लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र सोमवारी बँकेकडून एक शुद्धिपत्र प्रसिद्ध करण्यात आलं. या शुद्धिपत्रानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.