Sunny Deol | संसदेत कमी हजेरी का? अखेर सनी देओलने सांगितलं खरं कारण

| Updated on: Sep 11, 2023 | 4:26 PM

राजकारणाच्या बाबतीत सनी देओलचा रिपोर्ट काही खास नाही. गुरदासपूरमधील लोक तर त्याच्यावर खूप नाराज आहेत. त्यातच आता सनी देओलने निवडणूक लढवण्यास साफ नकार दिला आहे.

Sunny Deol | संसदेत कमी हजेरी का? अखेर सनी देओलने सांगितलं खरं कारण
Sunny Deol
Follow us on

मुंबई | 11 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओल चित्रपटसृष्टीसोबतच राजकारणातही सक्रिय आहे. संसदेचा सदस्य असूनही आपल्या कार्यकाळात त्याची संसदेत फार कमी हजेरी दिसून आली. यावरून अनेकदा त्याला प्रश्नही विचारले गेले. इतकंच नव्हे तर त्याच्या गुरुदासपूर मतदारसंघातील नागरिकसुद्धा सनी देओलवर नाराज आहेत. त्याने तिथल्या नागरिकांचे प्रश्नच ऐकून घेतले नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने या सर्व प्रश्नांची उत्तरं मोकळेपणे दिली आहेत. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात त्याने नुकतीच हजेरी लावली होती.

संसदेत कमी हजेरी का?

“माझी हजेरी फारच कमी आहे आणि ही चांगली गोष्ट आहे असं मी म्हणत नाही. पण जेव्हा मी राजकारणात आलो, तेव्हा हे माझं विश्वच नाही असं मला फार जाणवलं. पण मी माझ्या मतदारसंघासाठी काम करतोय आणि पुढेसुद्धा करत राहीन. मग मी संसदेत जात असो किंवा नसो, त्यामुळे माझ्या मतदारसंघातील कामावर काहीच परिणाम होणार नाही. त्याचप्रमाणे मी जेव्हा संसदेत जातो, तेव्हा मला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. सुरक्षेचा प्रश्न असतो आणि कोविडदरम्यान जाणं शक्यच नव्हतं. अभिनेता असल्याने सतत लोक तुमच्याभोवती घोळका करतात. माझ्याकडे मतदारसंघासाठी केलेल्या कामांची यादी आहे. पण मी त्या लोकांपैकी नाही, जे स्वत:च्याच कामाची प्रशंसा करत बसतात. पण राजकारणाविषयी बोलायचं झाल्यास, ते माझ्यासाठी योग्य क्षेत्र वाटत नाही”, असं सनी देओल म्हणाला.

भाजपकडून लढवली निवडणूक

2024 मध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचंही सनीने यावेळी स्पष्ट केलं. सनी देओलने 23 एप्रिल 2019 रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याने पंजाबमधील गुरदासपूर इथून विजय मिळवला. काँग्रेसच्या सुनील जखरचा त्याने पराभव केला होता.

हे सुद्धा वाचा

सनी देओलच्या मतदारसंघात त्याच्या विरोधात फार नाराजी पहायला मिळते. अनेकदा तो बेपत्ता असल्याचे उपरोधिक पोस्टर्स तिथे लावले गेले आहेत. इतकंच नव्हे तर त्याच्या ‘गदर 2’ या चित्रपटालाही तिथे विरोध केला गेला. सनी देओलचा मतदारसंघ असूनही तो तिथल्या लोकांची भेट घेत नाही, त्यांच्या समस्या जाणून घेत नाही, विकासासाठी काही करत नाही, असा आरोप गुरदारपूरमधल्या नागरिकांनी केला.