मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल या दोघांनी या वर्षात ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. एकीकडे धर्मेंद्र यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात 346 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसरीकडे 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘गदर 2’ने जगभरात 672 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे बापलेकाची जोडी सध्या इंडस्ट्रीत हिट ठरतेय. मात्र यादरम्यान धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी चर्चांना उधाण आलं. सोमवारी धर्मेंद्र यांना सनी देओल उपचारासाठी अमेरिकेला घेऊन गेल्याचं म्हटलं गेलं. या चर्चांवर आता सनी देओलने प्रतिक्रिया दिली आहे.
11 सप्टेंबर रोजी सनी देओल वडिलांना अमेरिकेला उपचारासाठी घेऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. “धरमजी हे आता 87 वर्षांचे असून त्यांना आरोग्याशी संबंधित विविध समस्या आहेत. म्हणूनच उपचारासाठी त्यांना अमेरिकेला घेऊन जाण्याचा निर्णय सनीने घेतला आहे. हे दोघं उपचारानिमित्त पुढील 15 ते 20 दिवस तिथेच राहणार आहेत”, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’नं दिलं होतं. आता सनी देओलने या चर्चा फेटाळल्या आहेत.
उपचारासाठी अमेरिकेला गेल्याचं सनी देओलने नाकारलं आहे. सनी देओल आणि धर्मेंद्र हे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत, कोणत्याही उपचारासाठी नाही, असं त्याच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं. त्याचप्रमाणे ते दोघं 16 सप्टेंबरपर्यंत मुंबईत परततील असंही त्यांनी सांगितलं आहे. सोमवारी सनी देओलने इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले होते. ‘कॅलिफोर्नियामध्ये विनितचा वाढदिवस साजरा केला’, असं लिहित त्याने सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले होते.
सनी देओलचा छोटा मुलगा राजवीर देओलसुद्धा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आगामी ‘दोनो’ या चित्रपटातून तो पुनम ढिल्लनची मुलगी पालोमा ढिल्लनसोबत इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवणार आहे. सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने 2019 मध्ये ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.