मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यावरून अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मयने मोठा निर्णय घेतला. जर पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्याने माझ्या मुलाच्या नावावरून ट्रोलिंग केलं जात असेल तर यापुढे कधीच ती भूमिका साकारणार नाही, असं त्याने जाहीर केलं. त्याच्या या निर्णयाचा अनेक चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी विरोध केला. यादरम्यान आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट चर्चेत आली आहे. सुप्रिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित जहांगिर मांडलेकर या नावाला पाठिंबा दिला.
‘जहांगीर मांडलेकर, तुला अनेकानेक शुभ आशीर्वाद’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. चिन्मय मांडलेकर आणि त्याची पत्नी नेहा मांडलेकर यांना गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवलंय, असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. या टीकेनंतर नेहाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं, त्याचा नेमका अर्थ काय हे सांगत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं होतं. त्यानंतर काही तासांनी चिन्मयने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत मोठा निर्णय जाहीर केला.
“जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्याने माझ्या कुटुंबीयांना, मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही,” असं त्याने म्हटलं होतं. त्याच्या या व्हिडीओवर सर्वसामान्यांपासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या.
“मी आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का, असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. माझ्या मुलाचा जन्म 2013 मध्ये झाला आणि आज तो 11 वर्षांचा आहे. हे ट्रोलिंग तेव्हा नाही झालं, ते आता होतंय. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातल्या, महाराष्ट्राबाहेरच्या, देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं. फक्त मराठीच नाही, तर अमराठी लोकांचंसुद्धा प्रेम मिळालं. पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रपूर्वक हे सांगू इच्छितो की यापुढे मी याही भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम, मी करत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर एक वडील म्हणून, नवरा म्हणून आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे”, असं तो म्हणाला.