अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला आहे. गोळीबारात कोणी जखमी झालेलं नसलं तरी, सर्वत्र खळबळ माजली आहे. सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणारे दोन अज्ञात व्यक्ती सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या चर्चांनी जोर धरला आहे. यावर आता राजकीय व्यक्तींच्या देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. खासदार सुप्रिया सुळे याने घटनेचा विरोध करत भाजपवर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर अब की बार गोळीबार सरकार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे, राज्यात आणि देशात नेमकं काय चाललंय ? असा प्रश्न देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, ‘पुणे शहरात कोयता गँग हा शब्द माहिती होता का? यावर तोडगा का निघत नाही, ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम कोण वाढवत आहे.’ असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करत आरोपी फरार झाले आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.
लॉरेन्स विश्नोई अँगलवरूनही पोलीस तपास सुरू झाला आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात झोन 9 डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ माजली आहे.
सलमान खान का आहे लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर?
एनआयएच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं की, सलमानला त्याच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवलं आहे. त्याचं कारणही त्याने सांगितले. 1998 मध्ये सलमान खान यानं काळवीटाची शिकार केली होती. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे.