आंध्रप्रदेश | 24 जुलै 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सूर्याने रविवारी 23 जुलै रोजी आपला 48 वा वाढदिवस साजरा केला. या तमिळ स्टारचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसतो. मात्र सूर्याच्या वाढदिवशी आंध्रप्रदेशमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सूर्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावणाऱ्या दोन चाहत्यांचा करंट लागून मृत्यू झाला. आंध्रप्रदेशमधील पलनाडू जिल्ह्यात ही घटना घडली. नक्का व्यंकटेश आणि पोलुरी साई हे दोघं कॉलेज विद्यार्थी सूर्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा बॅनर लावत होते. मात्र फ्लेक्सीच्या लोखंडी रॉडचा ओव्हरहेड विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
व्यंकटेश आणि साई हे दोघं आंध्रप्रदेशमधील एका खासगी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी होते. मृत्यूनंतर या दोघांचं पार्थिव नरसरावपेठ इथल्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं आहे. या दु:खद घटनेत आपल्या सख्ख्या भावाला गमावल्यानंतर पोलुरू साईची बहीण अनन्याने कॉलेजच्या अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवलं आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझ्या भावाच्या मृत्यूला कॉलेज प्रशासन जबाबदार आहे. त्यांनी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. आम्ही कॉलेजची भरमसाठ फी भरत आहोत. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांची देखरेख केली जाईल. पण हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचं संरक्षण कॉलेजकडून होत नाहीये. आम्ही रोजंदारीचं काम करतो. फी भरण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागतो.”
या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेवर अद्याप अभिनेता सूर्याची कोणतीच प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मुख्यत: तमिळ चित्रपटात काम करणाऱ्या सूर्याचा दाक्षिणात्य राज्यांमध्ये खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा वाढदिवस आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो.
वाढदिवसानिमित्त सूर्याने त्याच्या आगामी ‘कंगुवा’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवली. या चित्रपटाच्या निमित्ताने सूर्या आणि दिग्दर्शक शिवा पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. यामध्ये सूर्यासोबतच योगी बाबू, रेडिन किंग्सले, कोवई सरला आणि आनंदराज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.