चेन्नई : 12 मार्च 2024 | दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस तेलुगू’ फेम सूर्य किरणचं वयाच्या 51 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून सूर्यवर काविळीचे उपचार सुरू होते. सोमवारी त्याची प्रकृती आणखी खालावली. सूर्य किरणच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोमवारी सूर्य किरणने अखेरचा श्वास घेतला. पीआरओ सुरेशने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. ‘आजारपणामुळे सूर्य किरणचं निधन चेन्नईच्या एका रुग्णालयात झाला. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो’, असं त्याने लिहिलं.
सूर्य किरण दिग्दर्शनासोबतच अभिनय क्षेत्रातही कार्यरत होता. त्याने बालकलाकार म्हणून अनेक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘कदल मींगल’, ‘मंगम्मा सबाधम’, ‘मनीथान’, ‘स्वयं कृषी’ आणि ‘कैदी नंबर 786’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘सत्यम’ हा होता. 2003 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुमंत आणि जिनिलिया डिसूझा देशमुख मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. जवळपास 150 हून अधिक दिवस हा चित्रपट थिएटरमध्ये होता. ‘सत्यम’नंतर त्याने ‘ब्रह्मास्त्रम’, ‘राजू भाई’, ‘चाप्टर 6’ यांसारख्या चित्रपटांचंही दिग्दर्शन केलंय. 2020 मध्ये तो ‘बिग बॉस तेलुगू’च्या चौथ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.
Director #SuryaKiran has passed away due to jaundice.
He directed telugu films, Satyam, Raju Bhai and a few others. He was also a former contestant on Biggboss Telugu.
Om Shanti. pic.twitter.com/CrDctCs9UZ
— Suresh PRO (@SureshPRO_) March 11, 2024
सूर्य किरण यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांची पत्नी कल्याणीसुद्धा अभिनेत्री आहे. सूर्य किरण यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. सूर्य किर्ण यांना बाल कलाकाराच्या भूमिकांसाठी केंद्र सरकारकडून पुरस्कार आणि दिग्दर्शक म्हणून केलेल्या कामगिरीसाठी राज्य पुरस्काराने (नंदी पुरस्कार) सन्मानित करण्यात आलं होतं.
याआधी हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री अमनदीप सोहीचंही काविळीने निधन झालं. अमनदीप ही ‘झनक’ फेम अभिनेत्री डॉली सोहीची बहीण आहे. अमनदीपच्या निधनाच्या अवघ्या तासांतच डॉलीचंही सर्वाइकल कॅन्सरने निधन झालं.