बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्ष लोटली आहे. तरी देखील अभिनेत्याच्या मृत्यूचं रहस्य गुलदस्त्यात आहे. सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी स्वतःला संपवून घेण्याचा निर्णय का घेतला? या प्रश्नाचं उत्तर अद्यापही मिळू शकलेलं नाही. पण आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणात तुरुंगात असलेल्या ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट पॉल बार्टेल्स याची निर्देष मुक्तता झाली आहे. ज्यामुळे सध्या सर्वत्र सुशांत सिंह राजपूत याच्या केसची चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर, 2020 मध्ये अभिनेत्याच्या निधनानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून पॉल बार्टेल्स याला अटक करण्यात आली होती. पण आता कोर्टाकडून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. पॉल बार्टेल्स याच्या विरोधात कोणते ठोस पुरावे न मिळाल्यामुळे पॉल बार्टेल्स याची सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पॉल बार्टेल्स एक ड्रग्स विक्रेता असल्याची मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. याप्रकरणात इतर दोन आरोपींनी पॉल बार्टेल्स याचं नाव घेतलं होतं. पण त्याच्या विरोधात पोलिसांना कोणताच ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे पुरावे नसताना फक्त सरआरोपीच्या जबानीवरून कोणी आरोपी होत नाही… असं विशेष नार्कोटिक ड्रग्ज एन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे पॉल बार्टेल्स याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये वांद्रे येथील राहत्या घरी स्वतःला संपवलं. अभिनेत्यांच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. याप्रकरणी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची देखील चौकशी करण्यात आली होती. अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेत्री सारा अली खानी याची देखील चौकशी एनसीबीकडून करण्यात आली. तेव्हा अभिनेत्याच्या चाहत्यांनी देखील इंडस्ट्रीवर निशाणा साधला होती. इंडस्ट्रीमधील गटबाजी आणि घराणेशाही विरोधात देखील चाहत्यांनी आवाज उठवला होता. अभिनेत्याच्या निधनाच्या 4 वर्षानंतर देखील सुशांतने टोकाचं पाऊल का उचललं… याचा तपास सुरु आहे.
आजही चाहते सुशांत सिंह राजपूत याला विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर अभिनेत्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय अभिनेत्याची बहीण देखील सोशल मीडियावर सुशांतच्या आठवणी शेअर करत असते.