मुंबई : तीन वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी वांद्रे इथल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातोय. मात्र अद्याप कोणताच पुरावा सीबीआयच्या हाती लागला नाही. किंबहुना याप्रकरणी सीबीआयने अद्याप चार्जशीटसुद्धा दाखल केला नाही. त्यामुळे सुशांतला न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा अद्याप त्याचे असंख्य चाहते आणि कुटुंबीय करत आहेत. तर दुसरीकडे सीबीआयकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर अद्याप अमेरिकेकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नसल्याचं कळतंय. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणाचा तपास प्रलंबित आहे. 2021 मध्ये प्रीमिअर अँटी-करप्शन एजन्सीने कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या गुगल आणि फेसबुकला औपचारिक विनंती पाठवली होती. यामध्ये त्यांनी सुशांतच्या डिलिट झालेल्या चॅट्स, ईमेल आणि पोस्टचे तपशील शेअर करण्याची मागणी केली होती. घटनांची पार्श्वभूमी समजण्यासाठी सुशांतचे सर्व चॅट्स, मेल्स आणि पोस्ट्सचं विश्लेषण करणं गरजेतं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
भारत आणि अमेरिकेत परस्पर कायदेशीर सहाय्य करार (MLAT) आहे, ज्या अंतर्गत दोन्ही देशांमध्ये कोणत्याही देशांतर्गत तपासात माहिती शेअर केली जाऊ शकते. या कराराशिवाय ही गोष्ट शक्य नाही. याविषयी एका सीबीआय अधिकाऱ्याने सांगितलं, “आम्ही अजूनही पुराव्यांबाबत अमेरिकेकडून प्रतिसादाची वाट पाहत आहोत. ज्यामुळे आम्हाला हा खटला मार्गी लावता येईल. म्हणूनच सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा अंतिम रुप देण्यात विलंब होत आहे.” सुशांतच्या कुटुंबीयांचं प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील विकास सिंह यांनी सांगितलं की त्यांना या तांत्रिक पुराव्याच्या विनंतीबद्दल माहीत नव्हतं. “मात्र सीबीआयने या प्रकरणाला मंद गतीने मृत्यू देण्चाचा प्रयत्न केला आहे,” असा आरोप त्यांनी केला होता.
यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरुवातीला सुशांतच्या प्रकरणात कोणते ठोस पुरावे नव्हते. जी काही माहिती उपलब्ध होती की ऐकिवातली माहिती होती. नंतर काही लोकांनी त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा केला. या लोकांशी संपर्क साधला गेला आणि पोलिसांकडे ते पुरावे सादर करण्यास त्यांना सांगण्यात आलं. या लोकांनी सादर केलेल्या पुराव्यांची विश्वासार्हता तपासली जात आहे. हे पुरावे विश्वासार्ह असतील तर त्याआधारे पुढील कारवाई नक्कीच केली जाईल. मात्र आता मी त्याबद्दल काहीही बोलणं घाईचं ठरेल. योग्य वेळी मी त्यासंदर्भात बोलेन.”