मुंबई : अभिनेता रोहन राय त्याच्या ‘पिया अलबेला’ या मालिकेतील सहकलाकार शीन दास हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचं लग्न 22 एप्रिल रोजी काश्मिरमध्ये मोजक्या कुटुंबीयांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी रोहनची एक्स गर्लफ्रेंड दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशाने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजरचंही काम केलं होतं. रोहन आणि शीनच्या लग्नाच्या एक दिवस आधी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाला होता. दिशाने आत्महत्या केली होती अशी चर्चा होती. मात्र तिचा मृत्यू हा केवळ अपघात होता, असं सीबीआयने स्पष्ट केलं. 28 वर्षीय दिशाने बऱ्याच सेलिब्रिटींसाठी मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्यात सुशांतचाही समावेश होता. दिशाच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच सुशांतचं निधन झालं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी रोहन आणि शीन एकमेकांना डेट करू लागले.
रोहन आणि शीन यांनी 2018 मध्ये ‘पिया अलबेला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर या दोघांमधील जवळीक वाढली होती. “शूटिंगदरम्यान आमच्यात चांगली मैत्री होती, मात्र माझ्या कठीण काळात तिने माझी खूप साथ दिली. तेव्हापासून आमच्यात अधिक जवळीक निर्माण झाली”, असं रोहनने सांगितलं.
या लग्नाविषयी प्रतिक्रिया देताना शीन म्हणाली, “जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. आम्ही जेव्हा बोलायला लागलो, तेव्हा त्याला अशा परिस्थितीत पाहून मला खूप वाईट वाटायचं. एक मैत्रीण म्हणून मला त्याची काळजी होती. आता आम्ही लग्न करत असल्याने मी प्रत्येकाला हे म्हणू शकते की मी माझ्या मित्राशी लग्न करतेय. एके दिवशी जेव्हा त्याला सांगितलं की मी लग्नाबाबत गंभीरपणे विचार करतेय आणि त्यानेही विचार करावा. तेव्हा त्याने मला विचारलं की, आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी वर्षभर वेळ देऊया का? आमच्या नात्यातील सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, आमचे विचार खूप जुळतात.”
सुशांत सिंह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियन मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या 6 दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी तार असल्याचा संशय वर्तवला गेला होता. त्याकाळी पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं होतं. मात्र नंतर सीबीआयनं दिशा सालियनच्या मृत्यूला अपघात ठरवलं.