काश्मीर | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली होती. त्यावेळी दिशाचा साखरपुडा टेलिव्हिजन अभिनेता रोहन रायशी झाला होता. आता दिशाच्या मृत्यूच्या जवळपास दोन वर्षांनंतर रोहनने लग्न केलं आहे. ‘पिया अलबेला’ या मालिकेतील सहअभिनेत्री शीन दासशी त्याने 22 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये लग्नगाठ बांधली. या मालिकेत रोहनने शीनच्या ऑनस्क्रीन भावाची भूमिका साकारली होती. मालिकेच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.
दिशाच्या मृत्यूनंतर रोहनने काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. त्या कठीण काळात शीनने त्याची खूप साथ दिली आणि आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली असं म्हटलं जातं. शीन ही स्वत: एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने बऱ्याच मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
शीन आणि रोहन यांनी काश्मीरमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. काश्मीर हे शीन दासचं मूळ गाव आहे. त्यामुळे काश्मिरी विवाहपद्धतींनुसार दोघांचं लग्न पार पडलं. या लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाला होता. दिशाने आत्महत्या केली होती अशी चर्चा होती. मात्र तिचा मृत्यू हा केवळ अपघात होता, असं सीबीआयने स्पष्ट केलं. 28 वर्षीय दिशाने बऱ्याच सेलिब्रिटींसाठी मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्यात सुशांतचाही समावेश होता. दिशाच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच सुशांतचं निधन झालं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी रोहन आणि शीन एकमेकांना डेट करू लागले होते.
रोहन आणि शीन यांनी 2018 मध्ये ‘पिया अलबेला’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. दिशाच्या मृत्यूनंतर या दोघांमधील जवळीक वाढली होती. “शूटिंगदरम्यान आमच्यात चांगली मैत्री होती, मात्र माझ्या कठीण काळात तिने माझी खूप साथ दिली. तेव्हापासून आमच्यात अधिक जवळीक निर्माण झाली”, असं रोहनने सांगितलं होतं.
सुशांत सिंह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियन मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या 6 दिवसांनंतर म्हणजे 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी तार असल्याचा संशय वर्तवला गेला होता. त्याकाळी पोलिसांनी दिशा सालियनच्या मृत्यूला आत्महत्या ठरवलं होतं. मात्र नंतर सीबीआयनं दिशा सालियनच्या मृत्यूला अपघात ठरवलं.