दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मालिकांमधून करिअरची सुरुवात केली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. टेलिव्हिजनपासून बॉलिवूडपर्यंत त्याने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर वेगळं स्थान निर्माण केलं. ‘काय पो छे’, ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या. अत्यंत मोठा चाहतावर्ग असलेला सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. आजही अनेकदा चाहते सुशांतची आठवण काढतात. सध्या सोशल मीडियावर सुशांतसारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.
एका इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हुबेहूब सुशांतसारखा दिसणाऱ्या तरुणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याची हेअरस्टाइल, हास्य, डोळे, चेहरा हुबेहूब सुशांतसारखाच आहे. या तरुणाचं नाव अयान असं असून सोशल मीडियावर त्याने स्वत:चे अनेक व्हिडीओ पोस्ट केले आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अयान हा सुशांतचीच कॉपी असल्याचं काहींनी म्हटलंय. तर फेस ॲप किंवा AI च्या मदतीने त्याने स्वत:चे असे व्हिडीओ बनवल्याचा दावाही काहींनी केला आहे. असं असूनही अयानच्या व्हिडीओंना लाखोंमध्ये व्ह्यूज आणि लाइक्स मिळत आहेत.
जून 2020 मध्ये सुशांत मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सुशांतच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला जोरदार धक्का बसला होता. मानसिक स्वास्थ्य, इंडस्ट्रीतील घराणेशाही, गटबाजी यावरून विविध चर्चा होऊ लागल्या होत्या. त्याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयकडून केला जातोय. मात्र अद्याप कोणताच पुरावा सीबीआयच्या हाती लागला नाही. किंबहुना याप्रकरणी सीबीआयने अद्याप चार्जशीटसुद्धा दाखल केला नाही. त्यामुळे सुशांतला न्याय कधी मिळेल याची प्रतीक्षा अद्याप त्याचे असंख्य चाहते आणि कुटुंबीय करत आहेत.