मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे हे नुकतेच तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. ब्रिटिश मूळच्या त्रिणाशी त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी तिसरं लग्न केलं असून लंडनमध्ये दोघांनी रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन पार्टीला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एका फोटोने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. हा फोटो आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांचा आहे. या फोटोमध्ये ते सुपरमॉडेल उज्ज्वला राऊतसोबत दिसले. त्यामुळे अभिनेत्री सुष्मिता सेननंतर ते उज्ज्वलाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
उज्ज्वला राऊतचा जन्म 1978 मध्ये झाला असून ती नव्वदच्या दशकातील सुपरमॉडेल म्हणून ओळखली जाते. तिचे वडील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त होते. उज्ज्वलाने किशोरवयातच मॉडेलिंगला सुरुवात केली. 1996 मध्ये 17 वर्षीय उज्ज्वलाने फेमिना मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला आणि त्यात तिने ‘फेमिना लूक ऑफ द इअर’चा किताब जिंकला. त्याच वर्षी फ्रान्समधल्या 1996 एलिट मॉडेल लूक कॉन्टेस्टमध्ये तिने टॉप 15 मध्ये स्थान मिळवलं.
नव्वदच्या दशकात उज्ज्वला ही देशातील टॉप मॉडेल बनली. यवेस सेंट-लॉरेंट, रॉबर्टो कॅव्हली, ह्युगो बॉस, डॉल्से आणि गबाना, गुची, गिव्हेंची, व्हॅलेंटिनो, ऑस्कर दे ला रेंटा आणि एमिलियो पुची यांसारख्या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्ससाठी तिने रॅम्प वॉक केलं. व्हिक्टोरियाच्या सिक्रेट फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करणारी ती पहिली भारतीय ठरली. 2002 आणि 2003 या सलग दोन वर्षांसाठी तिने रॅम्प वॉक केला होता. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इअर या शोमध्ये परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये ती मिलिंद सोमणसोबत झळकली होती.
जून 2004 मध्ये उज्ज्वला राऊतने स्कॉटिश दिग्दर्शक मॅक्सवेल स्टेरीशी लग्न केलं. मात्र 2011 मध्ये दोघांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. या दोघांना क्षा नावाची मुलगी आहे. मुलीच्या पालकत्वावरून दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला होता.