मुंबई | 26 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या तिच्या ‘ताली’ या सीरिजमधील दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिने ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्ती श्रीगौरी सावंतची भूमिका साकारली आहे. ‘आर्या’नंतर ही तिची आणखी एक जबरदस्त भूमिका मानली जात आहे. आपल्या कामासोबतच सुष्मिता अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरते. गेल्या वर्षी तिचं नाव प्रसिद्ध बिझनेसमॅन ललित मोदीसोबत जोडलं गेलं होतं. या दोघांचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर खुद्द ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचं नातं जाहीर केलं होतं. त्यानंतर तिला ‘गोल्ड डिगर’ म्हणून नेटकरी ट्रोल करू लागले. या टीकेवर आता सुष्मिताने सडेतोड उत्तर दिलं आहे.
जुलै 2022 मध्ये ललित मोदी यांनी इन्स्टाग्रामवर सुष्मितासोबतचे काही खासगी फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण जेव्हा ललित यांनी सुष्मिताबद्दलच्या भावनांना जाहीरपणे व्यक्त केलं, तेव्हा तिला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलं. रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर लगेचच ललित मोदीसारख्या बिझनेसमॅनला डेट केल्यामुळे तिला ‘गोल्ड डिगर’ म्हटलं गेलं. नंतर सप्टेंबर महिन्यात ललित यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम बायोमधून सुष्मिताचं नाव हटवलं. त्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. सततच्या ट्रोलिंगनंतर त्यावेळी सुष्मिताने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्टसुद्धा लिहिली होती.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुष्मिताने पुन्हा एकदा रोखठोक उत्तर देत ट्रोलर्सचं तोंड बंद केलं. “मी ती पोस्ट लिहिण्यामागे एकच कारण होतं की मला त्यावर हसायचं होतं. मला त्या गोष्टींचा इतका त्रास झाला नव्हता. ते सर्व मनोरंजक होतं कारण तुम्ही एका महिलेला गोल्ड डिगर म्हणता आणि तुम्ही त्यावर कथा लिहून त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. मग यात फरक काय आहे”, असं ती म्हणाली.
या संपूर्ण प्रकरणात चांगल्या लोकांनी बाळगलेल्या मौनाबद्दल सर्वाधिक त्रास झाल्याचं सुष्मिताने यावेळी स्पष्ट केलं. ती पुढे म्हणाली, “जेव्हा चांगली लोकं गप्प बसतात, तेव्हा वाईट गोष्टी अधिक वाढतात आणि त्याचाच मला त्रास होतो. मी असं बऱ्याचदा पाहिलं आहे. आपण उत्तर देणं शोभिवंत नाही असा विचार केला जातो. मला फक्त लोकांना हे दाखवायचं आहे की मी त्या सर्व गोष्टीवर जोरजोरात हसले. झालेल्या घटनेतून हेच सिद्ध झालं की पिढ्या बदलल्या आहेत, परंतु लोकांची नैतिकता फारशी बदललेली नाही.”