मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत चाहत्यांना तिच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. सुष्मिताला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. याची माहिती तिने खुद्द एका पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर पहिल्यांदाच लाइव्ह येत ती आरोग्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने चाहत्यांचे, शुभचिंतकांचे आणि कुटुंबीयांचेही आभार मानले. हार्ट सर्जरीनंतर तिच्या प्रकृतीत सकारात्मक सुधारणा होत असल्याचंही सुष्मिताने सांगितलं आहे.
या कठीण काळात कुटुंबातील ज्या सदस्यांनी साथ दिली त्यांचे आणि डॉक्टर्सचे तिने आभार मानले. त्यानंतर सुष्मिताने सांगितलं की नेमकं तिच्यासोबत काय घडलं होतं? “मी खूप मोठ्या हार्ट अटॅकनंतर वाचले आहे. माझ्या आर्टरीमध्ये 95 टक्के ब्लॉकेज होतं. हा माझ्या आयुष्यातील एक टप्पा होता आणि तो मी पार केला. माझ्या हृदयात आता कोणत्याच गोष्टीची भीती नाही”, असं ती म्हणाली. यासोबतच तिने नानावटी रुग्णालयाच्या डॉक्टर्सचे आभार मानले.
आता गोष्टींकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन खूप बदलला आहे, असंही ती म्हणाली. “माझ्या मनात आता कोणतीच भीती नाही. उलट मी असा विचार करते मला स्वत:शीच एक प्रॉमिस केलं पाहिजे आणि गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. तुम्ही पाठवलेल्या पुष्पगुच्छांनी माझं घर भरलंय. माझं घर सध्या ‘गार्डन ऑफ ईडन’सारखं दिसू लागलंय”, असं ती गमतीने म्हणाली.
‘तुमच्या हृदयाला आनंदी आणि धैर्यवान ठेवा, तुम्हाला जेव्हा सर्वाधिक त्याची गरज असेल तेव्हा ते तुमच्यासोबत असेल (माझ्या वडिलांचे मोलाचे शब्द). काही दिवसांपूर्वी मला हृदयविकाराचा झटका आला, अँजियोप्लास्टी झाली, स्टेंट लागले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझ्या कार्डिओलॉजिस्टने मला सांगितलं की माझं हृदय खूप मोठं आहे. अनेक जणांचे मला आभार मानायचे आहेत. त्यासाठी मी दुसरी पोस्ट लिहीन. ही पोस्ट मी माझ्या शुभचिंतकांना आणि जवळच्या व्यक्तींना हे सांगण्यासाठी लिहितेय की आता सर्वकाही ठीक आहे, माझी प्रकृतीही ठीक आहे,’ अशी पोस्ट तिने लिहिली होती.
सुश्मिताच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकजण तिच्या हिंमतीची दाद देत आहे. त्याचसोबत तिला आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.