मलायकाशी आंतरधर्मीय लग्नाबद्दल सुझानच्या भावाचा खुलासा; म्हणाला “आम्ही गोव्यात गुपचूप..”

| Updated on: Oct 24, 2024 | 12:37 PM

सुझान खानचा भाऊ झायेद खान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. 2000 पाहुण्यांसमोर लग्न करण्यापूर्वी गोव्यात गुपचूप लग्न उरकलं होतं, असं त्याने सागितलं आहे.

मलायकाशी आंतरधर्मीय लग्नाबद्दल सुझानच्या भावाचा खुलासा; म्हणाला आम्ही गोव्यात गुपचूप..
झायेद खान, सुझान खान-हृतिक रोशन
Image Credit source: Instagram
Follow us on

‘मै हूँ ना’, ‘अंजाना अंजानी’, ‘दस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता झायेद खान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. झायेद हा सुझान खानचा भाऊ आणि हृतिक रोशनचा पूर्व मेहुणा आहे. त्याने 2005 मध्ये मलायका पारेखशी आंतरधर्मीय लग्न केलं. जवळपास हजारो पाहुण्यांसमोर धूमधडाक्यात सप्तपदी घेण्यापूर्वी मलायकाशी गुपचूप लग्न उरकल्याचा खुलासा झायेदने या मुलाखतीत केला आहे. जवळच्या आणि मोजक्यात लोकांमध्ये त्याला लग्न करायचं होतं, म्हणून त्याने आणि मलायकाने आधी गुपचूप लग्न करायचं ठरवलं होतं. याचं सर्व आयोजन खुद्द मलायकाने मूळ लग्नाच्या काही दिवस आधी केलं होतं. त्याचप्रमाणे त्यावेळी हिंदु विवाहपद्धतीबद्दल काहीच माहीत नसल्याचीही कबुली झायेदने दिली.

‘कपल ऑफ थिंग्स’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत झायेद त्याच्या या सिक्रेट लग्नाबद्दल व्यक्त झाला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी मलायकासुद्धा उपस्थित होती. ‘मैं हूँ ना’मध्ये झायेदच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अमृता रावनेच पती अनमोलसोबत मिळून ही मुलाखत घेतली. लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सात चित्रपटांची साइनिंग अमाऊंट परत केल्याबद्दलचा प्रश्न अमृताने झायेदला विचारला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “मी याचा उल्लेख कधीच केला नव्हता. आमच्या लग्नात पाहुण्यांच्या यादीत 2 हजार नावं होती. हे लग्न आहे की सर्कस असा विचार आमच्या डोक्यात येत होता. त्यामुळे आम्ही आमच्या जवळच्या तीस मित्रमैत्रिणींना फोन केला आणि सांगितलं की आपण गोव्यातील ताज विलेजला जातोय. तिथे सर्वांसाठी एक सरप्राइज असेल असं म्हटलं होतं.”

हे सुद्धा वाचा

“त्याठिकाणी मलायकाने लग्नाची सर्व व्यवस्था करून ठेवली होती. गोव्यातील ताज विलेजमध्ये आम्ही लग्न केलं होतं. ते खऱ्या अर्थाने अत्यंत सुंदर डेस्टिनेशन वेडिंग होतं. आम्हाला आमच्या लग्नाचा मनमुराद आनंद घेता आला. माझ्या कुटुंबात आम्ही सर्व धर्म पाळतो. आम्ही प्रत्येक देवाला मानतो आणि त्याबद्दल कोणीच कधी प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आमच्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. मला अजूनही आठवतंय की मला हिंदू विवाहपद्धतींबद्दल काहीच माहीत नव्हतं. पण मलायकाने मला जे जे करायला सांगितलं, मी तसं केलं,” असं तो पुढे म्हणाला. मलायकाच्या वाढदिवशीच या दोघांनी लग्न केलं होतं. या दोघांना झिदान आणि आरिज ही दोन मुलं आहेत.