मुंबई- देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत.. प्रत्येकजण दिवाळीच्या जल्लोषात मग्न आहे. दिवाळीनिमित्त गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्ण कुमार यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र त्यात सुझान खानने (Sussanne Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुझान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत (Arslan Goni) या पार्टीला पोहोचली होती. मात्र या दोघांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
कृष्ण कुमार यांच्या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र सुझान आणि अर्सलानने पापाराझी आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.
दिवाळीच्या पार्टीतून बाहेर येताना अर्सलान आणि सुझान एकमेकांना प्रेमाने निरोप देताना दिसत आहेत. याचवेळी सुझान पापाराझींसमोर अर्सलानला किस करते. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याच व्हिडीओमुळे सुझानला ट्रोल केलं जातंय.
‘कॅमेरासमोरच हे सर्व करण्याची गरज आहे का,’ असा खोचक सवाल एका नेटकऱ्याने केला. तर सुझान आणि अर्सलानने मुद्दाम कॅमेरासमोर येऊन किस केलं, जेणेकरून त्यांना पब्लिसिटी मिळेल, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी सुझानला तिच्या कपड्यांवरूनही ट्रोल केलं.
सुझान आणि अर्सलान हे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. या दोघांच्या व्हेकेशनचेही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. तर दुसरीकडे सुझानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशन हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय.
सुझान खान आणि हृतिक रोशनने 2000 साली लग्नगाठ बांधली. दोघांनी 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त होऊनही दोघे चांगले मित्र आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांसाठी दोघेही नेहमी एकत्र येतात. लॉकडाऊनमध्येही सुझान आणि हृतिक मुलांसाठी एकत्र राहिले होते.