मुंबई : गायक सोनू निगमच्या चेंबूरमधील लाइव्ह कॉन्सर्टनंतर सोमवारी रात्री धक्काबुक्कीची घटना घडली. स्टेजवरून खाली उतरताना एक व्यक्ती सोनू निगमसोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आली. मात्र बॉडीगार्डने फोटोस नकार दिल्यानंतर संबंधित व्यक्तीने धक्काबुक्की केली. सोनू निगमसोबत धक्काबुक्की करणारी ही व्यक्ती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा पुत्र स्वप्निल फातर्पेकर होती. याप्रकरणी सोनूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी स्वप्निल फातर्पेकरची बहीण सुप्रदा फातर्पेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“माझ्या भावाला सोनू निगमसोबत सेल्फी क्लिक करायचा होता. सेल्फी क्लिक करताना त्याचा सोनू निगमच्या बॉडीगार्डशी वाद झाला. ती फक्त एक फॅन मूमेंट होती, ज्यात चूक झाली. त्यानंतर आम्ही सोनू निगमचीही माफीसुद्धा मागितली आहे. अशा अनेक घटना घडत असतात. क्रिकेटच्या मैदानात कोणी पळत असतं, कोणी सेलिब्रिटीच्या पाया पडायला जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात आणि भारत जोडो यात्रेदरम्यानही अशा घटना घडल्या आहेत. माझा भाऊ सोनू निगमचा खूप मोठा चाहता आहे, त्याला फक्त सेल्फी काढायला होता. या प्रकरणाला राजकीय वळण देऊ नये, अशी माझी विनंती आहे,” असं त्या म्हणाल्या.
“माझ्याकडे एक व्यक्ती सेल्फीसाठी आली होती. मी नकार दिल्यानंतर त्याने मला अडवलं. नंतर समजलं की तो आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्निल फातर्पेकर आहे. मला वाचवण्यासाठी हरीप्रसाद मध्ये आले. त्याने त्यांनाही धक्का दिला, त्यानंतर मला धक्का दिला. धक्क्यामुळे मी खाली पडलो. मला वाचवण्यासाठी रब्बानी पुढे आले तर त्यांनाही धक्का दिला. ते थोडक्यात बचावले, नाहीतर त्यांना गंभीर दुखापत झाली असती. त्यात त्यांचे प्राणही जाऊ शकले असते. रब्बानी यांचं नशिब चांगलं होतं की खाली कोणती लोखंडी वस्तू नव्हती”, असं सोनू निगमने सांगितलं.
सोनू निगमसोबत सेल्फी काढण्यासाठी बॉडीगार्डने अडवल्यामुळे धक्काबुक्की झाली. यावेळी सोनू निगमला वाचवण्यासाठी त्याचा मित्र रब्बानी खान समोर आला. रब्बानीने धक्काबुक्कीदरम्यान सोनू निगमला वाचवलं खरं, मात्र त्यात तो स्वत: जखमी झाला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.