मुंबई : मानवाधिकार कार्यकर्ते आणि कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी फादर स्टॅन स्वामी यांचं मुंबईतील होली फॅमिली रुग्णालयात निधन झालं. ते ८४ वर्षाचे होते. विशेष म्हणजे आजच स्टॅन यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार होती. (Swara Bhaskar reacts on Stan Swamy death says its a Cold blooded murder)
फादर स्टॅन स्वामी पार्किनसन्ससह अनेक व्याधींनी ग्रस्त होते. त्यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागणही झाली होती. प्रकृती बरी नसल्याने त्यांना होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. स्टॅन यांच्या वकिलांनी त्यांची तब्येत सातत्याने खालावत असल्याची माहिती कोर्टाला दिली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टॅन स्वामी यांना आदरांजली वाहिली. तर अनेकांनी हा मृत्यू नसून खून असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात स्वरा भास्करनेही तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने शेअर केलेल्या स्टोरीद्वारे संताप व्यक्त केला आहे. स्वराने या घटनेला खून म्हटलं आहे. तिने लिहिलं आहे की, आपल्याला लाज वाटली पाहिजे. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, आपला हा देश तुमच्यासारख्या लोकांच्या लायक नाही. आजचा दिवस भारतासाठी अतिशय लज्जास्पद दिवस आहे. तिने ट्विटरवर या घटनेला ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ म्हटलं आहे.
पुण्यात 2018मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात स्टॅन यांचाही समावेश होता.
Cold blooded murder!
— Swara Bhasker (@ReallySwara) July 5, 2021
फादर स्टॅन आणि त्यांचे सहकारी बंदी असलेल्या माकपा (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर एनआयएने आरोप केला होता. तसेच एक प्रतिज्ञापत्रं सादर करून एनआयएने स्टॅन यांच्या जामिनाला विरोध केला होता. स्टॅन यांच्या आजाराचा काहीही ठोस पुरावा नाही. स्टॅन हे माओवादी असून देशात अशांतता निर्माण करण्यासाठी ते षडयंत्र रचत होते, असा दावा एनआयएने केला होता.
संबंधित बातम्या
Stan Swamy Death: कोण होते फादर स्टॅन स्वामी?; वाचा सविस्तर
Stan Swamy Death: भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं निधन
(Swara Bhaskar reacts on Stan Swamy death says its a Cold blooded murder)