मुंबई : आपल्या ट्विट्समुळे आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकली. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद याच्याशी तिने कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर जवळपास 40 दिवसांनी तिने लग्नाचा खुलासा केला. आता स्वरा आणि फहाद विधीवत लग्न करणार आहेत. आपल्या आजी-आजोबांच्या घरी पारंपरिक विवाहपद्धतींनुसार लग्न करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. त्यानंतर जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी तिने रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं आहे. आता सोशल मीडियावर स्वराची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेच्या हटके डिझाइनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मुंबईच्या थीमनुसार या लग्नपत्रिकेची डिझाइन करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईचा समुद्रकिनारा, थिएटरबाहेर लागलेला शाहरुख खानचा सुपरहिट ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या चित्रपटाचा पोस्टर, लोकांची गर्दी आणि त्यांच्या हातात काही फलक दिसत आहेत. या फलकांवर विविध संदेश लिहिण्यात आले आहेत. ‘हम सब एक है’ असं एकावर लिहिलंय तर दुसऱ्यावर ‘इंकलाब जिंदाबाद’ असं लिहिलेलं दिसतंय. ‘हम भारत के लोग’ आणि ‘हम देखेंगे’ असंही त्यावर लिहिण्यात आलं आहे.
यासोबतच लग्नपत्रिकेवर एक भलामोठा संदेश लिहिण्यात आला आहे. ‘कधी कधी आपण एखाद्या खास गोष्टीला दूरदूरपर्यंत शोधत असतो. मात्र नंतर समजतं की ती गोष्ट आपल्या जवळच होती. आम्ही प्रेमाचा शोध घेत होतो, पण मैत्री आधी मिळाली. हे सर्व एका विरोध प्रदर्शनातून सुरू झालं आणि राजकीय घटनेसोबत ही कथाही पुढे चालत गेली. त्या काळोखात आम्हाला प्रकाश मिळाला. द्वेषाच्या काळात आम्हाला प्रेम मिळालं. त्यात चिंता, अनिश्चितता आणि भितीसुद्धा होतीच. पण त्यासोबतच एक विश्वास आणि आशा होती’, असं त्यावर लिहिलंय.
या दोघांची पहिली भेट, मैत्री, प्रेम ते लग्नापर्यंतचा प्रवास अत्यंत रंजक आहे. स्वरा बेधडकपणे तिची मतं मांडण्यासाठी ओळखली जाते. त्याचसोबत ती विविध आंदोलनांमध्येही सहभागी होते. अशाच एका आंदोलनात तिची फहादशी पहिली भेट झाली.
फहादचा जन्म 2 फेब्रुवारी 1992 रोजी झाला. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. 2018 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनं (TISS) केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक मदत काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विद्यार्थी संघटनेनं संप पुकारला होता आणि त्या संपात फहाद आघाडीवर होता. त्याने अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पदवीचं शिक्षण घेतलंय. विद्यार्थी नेता म्हणून फहादची सुरुवात झाली आणि तो आता समाजवादी पक्षाची युवा शाखा असलेल्या समाजवादी युवजन सभेच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे.