मुंबई | 9 ऑक्टोबर 2023 : हमासने शनिवारी इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केल्यानंतर गाझा पट्टीत घनघोर युद्ध सुरू झालं आहे. हमासच्या हल्ल्याला इस्रायलकडूनही जबरदस्त प्रत्युत्तर देण्यात आलं. हमासने सुरू केलेल्या या हल्ल्यात इस्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. या युद्धाबाबत देशभरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण त्याबद्दल व्यक्त होत आहेत. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेसुद्धा हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाबाबत एक पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टमधून तिने हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलं की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे.
स्वरा भास्करने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘पॅलेस्टिनींवरील इस्रायलचं न संपणारं अत्याचार, त्यांच्या घरावर बळजबरीने कब्जा करणं, त्यांना त्यांच्याच भूमीवरून बेदखल करणे, स्थानिक इस्रायलींची धर्मांधता आणि हिंसाचार, लहान पॅलेस्टिनी मुलांची- किशोरवयीन मुलांची हत्या, गाझावर असलेली अनेक दशकांपासूनची नाकेबंदी आणि बॉम्ब हल्ले, गाझामधील नागरिकांवर, शाळांवर आणि रुग्णालयांवर झालेले बॉम्ब हल्ले याबद्दल जर तुम्हाला धक्का बसला नसेल, भीती वाटत नसेल तर मला वाटतंय की इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यांबद्दल तुम्हाला वाटत असलेली भीती आणि धक्का हे ढोंगीपणाचं आहे.’
गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात शंभर जण ठार झाले. तर दुसरीकडे इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्यात 198 नागरिक ठार झाल्याचा दावा पॅलेस्टींनीनी केला. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले आहेत. किनारी भागाभोवतीच्या सीमेवर हमास आणि इस्रायली सैनिकांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेत्यान्याहू यांनी हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आणि शत्रूला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला.