मुंबई : 16 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री स्वरा भास्करच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी तिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी निकाह केला होता. या दोघांनी धर्माची भिंत ओलांडून आपल्या प्रेमाला एक नवीन ओळख दिली होती. आधी कोर्ट मॅरेज आणि त्यानंतर धूमधडाक्यात हे लग्न पार पडलं होतं. आता लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी स्वराने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये ती तिच्या भीतीविषयी व्यक्त झाली, जी तिला फहादशी लग्न करताना जाणवत होती. स्वराने इन्स्टाग्रामवर पतीसोबतच बरेच फोटो पोस्ट केले आहेत. यासोबतच लग्नाच्या आठवणी शेअर केल्या आहेत.
फहादसोबतचे फोटो पोस्ट करत स्वराने लिहिलं, ‘बुद्धिमान लोक म्हणतात की फक्त मूर्खच घाई करतात. फहाद आणि मी लग्नासाठी घाई नक्की केली, पण त्याआधी आम्ही तीन वर्षे एकमेकांचा चांगले मित्र होतो. हे एक असं प्रेम होतं, जे आमच्या दोघांपैकी कोणीच त्याला उमलताना पाहिलं नव्हतं. कदाचित आमच्यात बरेच मतभेद होते, म्हणून असं असेल. हिंदू आणि मुस्लीम.. अशा दोन वेगळ्या धर्मांचे आम्ही आहोत. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे आणि आमचं विश्व वेगवेगळं आहे. एका मोठ्या शहराची मुलगी, जिचे कुटुंबीय इंग्रजीत बोलतात आणि एक छोट्या शहराचा मुलगा, जो पारंपरिक पश्चिमी यूपी कुटुंबातून आहे. तो उर्दू आणि हिंदुस्तानी बोलतो. मी हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री आहे, तर तो एक रिसर्च स्कॉलर, सामाजिक कार्यकर्ता आणि राजनेता आहे. मात्र आम्हा दोघांमध्ये एक गोष्ट सामान्य होती, ती म्हणजे शिक्षा. यामुळे प्रत्येक क्षेत्राकडे आम्ही सामान्य दृष्टीकोनातून पाहू लागलो. मग ती भाषा असो, समाज असो किंवा मग देश.’
फहादविषयी स्वराने पुढे लिहिलं, ‘आम्ही डिसेंबर 2019 मध्ये सीएए-एनआरसी विरोध प्रदर्शनादरम्यान एकमेकांना भेटलो. यानंतर हळूहळू मैत्री झाली आणि एकमेकांच्या विश्वासपात्र बनलो. मला फहादसोबत सुरक्षित वाटतं आणि त्याच्यासोबत मी भीतीशिवाय कोणत्याही विषयावर बिनधास्त चर्चा करू शकते. अनेक महिन्यांच्या गहन चर्चांनंतर, संवादांनंतर फहादने मला विचारलं की, पुढे काय? त्याने मला सांगितलं की जरी आपली कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी वेगळी असली तरी आपण एकमेकांसाठी अनुकूल आहोत. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तो ‘सेटल’ होईपर्यंत दोन-तीन वर्षे प्रतीक्षा केली तर आपण लग्न करू शकतो, असं तो म्हणाला होता. हे ऐकल्यानंतर मी स्तब्ध होते पण मला त्याच्या आत्मविश्वासावर विश्वास होता.’
स्वराने आपल्या धर्माविरोधात जाऊन फहादशी निकाह करण्याचं ठरवलं होतं, मात्र तिच्या मनात त्यावेळी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एक भीती होती. याविषयी व्यक्त होत तिने लिहिलं, ‘लोक काय म्हणतील, याचा मी नेहमीच विचार करायची. मी लोकांविरोधात जाऊन निर्णय घेतेय, त्यामुळे माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, इंडस्ट्रीतील ओळखीचे लोक आणि माझे प्रामाणिक ट्रोलर्स काय प्रतिक्रिया देतील, याची मला चिंता होती. फहादने माझ्या या अव्यक्त भीतीला ओळखलं आणि त्या भीतीवर आम्ही दोघांनी मिळून मात केली. आमच्या कुटुंबीयांनाही काळजी होती, पण आम्ही आमच्या प्रेमावर कायम राहिलो. आमच्या आई-वडिलांनी अडखळत का होईना आमच्या मोठ्या निर्णयाचा स्वीकार केला.’
‘आजपासून वर्षभरापूर्वी एसएमए अंतर्गत आमचं लग्न झालं. संविधानाला संरक्षित करण्याच्या विरोधात सुरू झालेलं नातं घटनात्मक तरतुदी अंतर्गत संपन्न झालं. एक महिन्यानंतर मी जेव्हा गरोदर होती, तेव्हा आजी-आजोबाच्या घरी त्याचा आनंद साजरा केला. संगीत, दावत आणि दावत-ए-वलीमा पार पडलं. दहा दिवसांचा तो कार्यक्रम एका सांस्कृतिक महोत्सवासारखा वाटला’, असं तिने या पोस्टच्या अखेरीस लिहिलं. स्वराने 23 सप्टेंबर रोजी मुलगी राबियाला जन्म दिला. मुलीच्या जन्माच्या दोन दिवसांनंतर त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत बाळाच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. त्याचवेळी त्यांनी बाळाचं नाव राबिया ठेवल्याचं जाहीर केलं होतं.