मुंबई : 5 मार्च 2024 | अभिनेता रणदीप हुडाची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड उत्सुकता आहे. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमधील एक-एक दृश्य अंगावर काटा आणणारा असल्याची भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. क्रांतिकारी नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये खुद्द रणदीपनेच सावरकरांची भूमिका साकारली आहे. ‘हम सबने पढा है की भारत को आझादी अहिंसा से ही मिली है. यह वो कहानी नहीं है’, या दमदार डायलॉगने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होते. सावरकर यांनी कशा पद्धतीने अखंड भारताची लढाई लढली, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी कशापद्धतीने आपली फौज उभी केली हे यातून पहायला मिळणार आहे.
आपल्या क्रांतिकारी व्यवहारामुळे सावरकर यांना इंग्रजांचा अत्याचारसुद्धा सहन करावा लागला होता. त्यांना दोन वेळा काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली होती. तरीसुद्धा सावरकर यांनी हार मानली नव्हती. त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. ट्रेलरच्या प्रत्येक सीनमध्ये रणदीपच्या भूमिकेतून सावरकरांची झलक पहायला मिळते. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तिने सावरकर यांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमध्ये अंकिताच्या भूमिकेचीही झलक पहायला मिळते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने 2019 मध्ये कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती ‘बागी 3’मध्ये झळकली होती.
रणदीप हुडाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट येत्या 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं दिग्दर्शनसुद्धा खुद्द रणदीपनेच केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडलं. या बायोपिकच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. आधी महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होते. मात्र शूटिंगदरम्यान रणदीपसोबत काही मतभेद झाल्याने त्यांनी या प्रोजेक्टमधून माघार घेतली.
“देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्या योगदानाकडे आजपर्यंत दुर्लक्ष केलं गेलं. त्यांची कथा ही जगासमोर आणायलाच हवी. ही भूमिका साकारणं माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असेल”, अशी भावना रणदीपने व्यक्त केली.