‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. मात्र काही वर्षांपूर्वी तिने ही मालिका सोडली. त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. अनेकदा तिच्या कमबॅकविषयी मालिकेच्या निर्मात्यांना प्रश्न विचारले जातात. अशातच सलमान खानच्या ‘बिग बॉस 18’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी दिशाला ऑफर मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. इतकंच काय तर तिला तब्बल 65 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याचंही म्हटलं जात होतं. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑफर आहे. तरीही दिशाने एवढी मोठी ऑफर नाकारल्याचं म्हटलं गेलं. या सर्व चर्चांमध्ये किती तथ्य आहे, असाही सवाल नेटकऱ्यांनी केला.
‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, दिशाबद्दल होणाऱ्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. 65 कोटी रुपये हा आकडा सहजच पसरवला जात असून इतकं मानधन कोणत्याच स्पर्धकाला दिलं जात नाही, असं कळतंय. याविषयी ‘इंडिया टुडे’च्या सूत्रांनी म्हटलंय, “एका संपूर्ण सिझनसाठी स्पर्धकांसाठी जे बजेट असतं, तेसुद्धा इतकं जास्त नसतं. 65 कोटी रुपयांची फक्त अफवा पसरवली जात आहे. एकाच स्पर्धकाला ते इतकी मोठी रक्कम कसं काय देऊ शकतात? फक्त लोकांचं लक्ष वेधण्यासाठी या अफवा पसरवल्या जात आहेत. बिग बॉसच्या स्पर्धकांना संपूर्ण सिझनसाठी रक्कम ठरवून दिली जात नाही. त्यांना फक्त साइनिंग फी मिळते. त्यानंतर ते शोमध्ये किती आठवडे राहतात, त्यावरून त्यांचं मानधन ठरवलं जातं.”
“जरी दिशाला काही कोटी रुपयांची ऑफर मिळाली असेल आणि ती दोन आठवड्यांतच घराबाहेर पडली असेल, तर अशात निर्मात्यांचं किती मोठं नुकसान असेल. ते एवढी मोठी रिस्क का घेतील”, असाही सवाल संबंधित सूत्रांनी केला आहे. जरी दिशा संपूर्ण सिझनमध्ये टिकली आणि फिनालेपर्यंत पोहोचली, तरी दर आठवड्याला तिला एकटीला चार कोटी रुपये मानधन मिळणं कल्पनेपलीकडचं आहे.
“दिशा वकानी ही दयाबेन म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली. गेल्या बऱ्याच काळापासून ती छोट्या पडद्यावरून दूर आहे. लोकांना तिला पुन्हा एकदा पडद्यावर पहायचं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवल्या गेल्या असतील. दिशा पडद्यावर जितकी मनोरंजक होती, तितकीच ती खऱ्या आयुष्यातही असेल असं नाही. त्यामुळे तिच्यावर इतकी मोठी रक्कम गुंतवून निर्माते रिस्क का घेतील”, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बिग बॉसचा अठरावा सिझन 6 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे.