‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. पण मालिकेतील अनेक कलाकारांनी असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मिसेस रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने शोचा निर्माता असित कुमार मोदीविरोधातील लैंगिक छळाचा खटला न्यायालयात दाखल केला होता आणि या लढाईमध्ये अभिनेत्रीचा विजय झाला असून असित मोदीला न्यायालयाने दोषी घोषित केलं आहे.
असित मोदीला दोषी घोषित करत न्यायालयाने लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिपोर्टनुसार, मोदीला 10 टक्के व्याजाने अभिनेत्रीला थकलेलं तिचं मानधन द्यायचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला मोदीकडून पाच लाख रुपयांचा दंड आणि बाकी मानधन 25-30 लाख रुपये येणं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
जेनिफर मिस्त्री म्हणाली, ‘हो माझा विजय झाला आहे. सुनावणी होऊन आज 40 दिवस झाले आहेत. पण तरी देखील मला माझे पैसे मिळालेले नाहीत. प्रॉडक्शन हाऊसने मला माझे पैसे दिलेले नाहीत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ती माझ्या मेहनतीची कमाई आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी मी कोर्टाची पायरी चढली. पण मला माझे पैसे अद्याप मिळालेले नाहीत.’
‘वास्तविक ज्या समितीचा आदेश आहे त्यांनी मला आदेशाचा तपशील प्रसारमाध्यमांसोबत शेअर करू नका असे सांगितलं होतं, त्यामुळे मी महिनाभराहून अधिक काळ कोणाला काहीही सांगितलं नाही. खटला जिंकूनही मला अजून न्याय मिळालेला नाही.’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेत्री मोदी याच्यासोबत मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्या नावाचा उल्लेख केला. पण त्यांना शिक्षा झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयावर जेनिफर मिस्त्रीने नाराजी व्यक्त केली आहे.
सांगायचं झालं तर, जेनिफर मिस्त्री हिनेच्या म्हणण्यानुसार, ‘होळीच्या दिवशी असित मोदी, सोहेल रमानी आणि जतिन बजाज यांनी काही कारण नसताना अभिनेत्रीला सेटवर थांबवून ठेवलं. सेटवरुन प्रत्येक जण गेल्यानंतर अभिनेत्रीसोबत तिघांनी मिळून गैरवर्तन केलं. अखेर अभिनेत्रीने पोलीस स्थानकात लैंगिक छळाचा खटला दाखल केला. काही दिवसांपूर्वी अभिनेते शैलेश लोढा यांनीही मानधनासाठी तक्रार दाखल केली होती.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या 15 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्यांच्या जवळचा झाला आहे. सोशल मीडियावर देखील मालिकेतील काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर मालिकेतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर असित मोदीवर गंभीर आरोप करत मालिकेचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या आरोपांमुळे असित मोदी याच्या अडचणीत वाढ झाली आहे.