मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. जेनिफरने त्यांच्यावर आणि प्रॉडक्शन टीममधील काही सदस्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने पवई पोलीस ठाण्यात लेखी तक्रारसुद्धा दाखल केली आहे. यानंतर तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. सत्य लवकरच सर्वांसमोर येईल असं ती या व्हिडीओत म्हणतेय. जेनिफरच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
“चुप्पी को मेरी कमजोरी मत समझना…मैं चुप थी क्योंकि सलीका है मुझमें. खुदा गवाह है कि सच क्या है. याद रख उसके घर में कोई फर्क नहीं है तुझमें और मुझमें” (माझ्या मौनाला माझी कमजोरी समजू नका. मी गप्प होते कारण, तो माझा स्वभावच होता. सत्य काय आहे हे देवालाही माहीत आहे. लक्षात ठेवा त्याच्यासमोर माझ्यात आणि तुमच्यात कोणताच फरक नाही) असं ती या व्हिडीओत म्हणताना दिसतेय. जेनिफरने या व्हिडीओमध्ये थेट असित मोदींचं नाव घेतलं नाही. मात्र तरीही तिने हा व्हिडीओ आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे.
जेनिफरने जवळपास 14 वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत काम केलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून तिने मालिकेत काम करणं बंद केलं आहे. निर्मात्यांवर आरोप करत जेनिफर म्हणाली, “असित मोदी यांनी याआधीही लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण मला काम गमावण्याची भिती होती. पण आता पुरे झालं. त्यांनी मला सेटवर बळजबरीने थांबवण्याचा प्रयत्न केला. गेट बंद करून मला बाहेर जाण्यापासून रोखलं. महिनाभरापूर्वी मी मेलद्वारे तक्रार केली होती, पण त्यावर मला काहीच उत्तर मिळालं नाही. मला खात्री आहे की ते या आरोपांचा तपास करतील. मी वकिलाची नियुक्ती केली आहे आणि मला लवकरच न्याय मिळेल.”
“ती आमची आणि मालिकेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आम्ही तिचा करार संपवल्याने ती आता तथ्यहीन आरोप करतेय”, असं असितकुमार मोदी म्हणाले.