जेठालालच्या मुलाचं धूमधडाक्यात लग्न; लेकीसह दयाबेनचीही उपस्थिती

| Updated on: Dec 18, 2023 | 3:22 PM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांच्या घरात सनईचौघडे वाजत आहेत. कारण दिलीप यांचा मुलगा लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत.

जेठालालच्या मुलाचं धूमधडाक्यात लग्न; लेकीसह दयाबेनचीही उपस्थिती
TMKOC
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 18 डिसेंबर 2023 | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांचा मुलगा विवाहबंधनात अडकणार आहे. संपूर्ण जोशी कुटुंब मुलाच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत आहे. सोशल मीडियावर दिलीप यांच्या मुलाचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या आनंदाच्या क्षणात ‘तारक मेहता..’ मालिकेतील कलाकारसुद्धा सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे मालिकेतून इतकी वर्षे गायब असलेली दयाबेन म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीसुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतेय. दिशाला या व्हिडीओमध्ये पाहून चाहतेसुद्धा खूप खुश झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिलीप जोशी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांसोबत आणि मुलासोबत दिसत आहेत. लग्नसोहळ्यात सर्वांचा जल्लोष सुरू आहे. यावेळी दिलीप यांनी पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि पगडी परिधान केली आहे. तर त्यांची मुलगी नियतीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. काही महिन्यांपूर्वी दिलीप यांची मुलगी नियतीचा लग्नसोहळा पार पडला होता. तर लग्नाच्या या व्हिडीओत दयाबेन म्हणजेच दिशा ही गुलाबी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तिची छोटी मुलगी फोटोसाठी पोझ देत आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र ब्रेकनंतर ती मालिकेत परतलीच नाही. दिशा मालिकेत पुन्हा कधी दिसणार, असा वारंवार सवाल निर्मात्यांना केला जातो. मात्र त्यावर अद्याप त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

दिशाशिवाय सुनैना फौजदार, अंबिका, नितीश भलुनी, पलक सिधवानी हे सर्व कलाकारसुद्धा दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाले आहेत. मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांडवडकरसुद्धा लग्नाला उपस्थित होते. त्यांची पत्नी स्नेहलने सोशल मीडियावर कार्यक्रमाचे बरेच फोटो शेअर केले आहेत.

दिलीप जोशी यांना ‘तारक मेहता..’ या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असून त्यांना ‘जेठालाल’ या नावानेच सर्वाधिक ओळखलं जातं. या मालिकेत ते 2008 पासून जेठालालची भूमिका साकारत आहेत. या मालिकेमुळे त्यातील कलाकारांना पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाल्या. दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. यामध्ये त्यांनी घरकाम करणाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘वन टू का फोर’, ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ते झळकले. मात्र ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जेठालालच्या भूमिकेमुळे त्यांना देशभरात तुफान प्रसिद्धी मिळाली आहे.