मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या 14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय. यातील काही कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर काहींची जागा नव्या कलाकारांनी घेतली. मात्र तरीसुद्धा या मालिकेच्या टीआरपीमध्ये फारसा फरक पडला नाही. यामध्ये अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल तर मुनमुन दत्ता या बबिता अय्यरची भूमिका साकारत आहेत. जेठालालला बबिताजी किती आवडते हे ‘तारक मेहता..’च्या प्रेक्षकांना चांगलंच ठाऊक असेल. मात्र आता तब्बल 14 वर्षांनंतर जेठालालच्या मनाची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये जेठालालला चक्क बबिता मिठी मारते. त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाही. एपिसोडमधील हा भाग तारक मेहताच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तब्बल 3740 एपिसोड्सनंतर जेठालालच्या आयुष्यात असा क्षण आल्याने नेटकऱ्यांनाही व्यक्त होण्याचा मोह आवरत नाहीये. ’14 वर्षांचा वनवास पूर्ण झाला’, असं एका चाहत्याने लिहिलं आहे. तर ‘जेठालालला मोक्ष प्राप्त झाला’, अशी मस्करी दुसऱ्या युजरने केली. ‘जेठालालचं आयुष्य सफल झालं’, असंही एकाने म्हटलंय.
या लोकप्रिय मालिकेने आतापर्यंत 3740 एपिसोड्स पूर्ण केले. अगदी पहिल्या एपिसोडपासून जेठालालला बबिता आवडत असल्याचं पहायला मिळालं. तिच्यासाठी जेठालाल काहीही करण्यासाठी तयार असतो. मात्र या दोघांमध्ये आजवर असा कोणताच सीन दाखवण्यात आला नव्हता, ज्यामध्ये त्यांची जवळीक पहायला मिळेल. अखेर तो क्षण आल्याने चाहते या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच या मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री झाली. अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. तर या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी परतणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दयाबेन मालिकेत कधी येणार याविषयी दिलीप यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “हे तर निर्मात्यांवर अवलंबून आहे. मालिकेत नवीन अभिनेत्री आणायची की नाही, याचा निर्णय तेच घेतील. एक कलाकार म्हणून मला दयाच्या भूमिकेची खूप आठवण येते. बऱ्याच काळापासून प्रेक्षकांनीही दया आणि जेठा यांच्यामधील मजेशीर सीन्सचा आनंद लुटला आहे. जेव्हापासून दिशा या मालिकेतून निघून गेली, तेव्हापासून तो भाग, तो अँगल, ती मजामस्ती गायब आहे. बघुयात, मी तर नेहमीच सकारात्मक विचार करतो. असित भाईसुद्धा नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.”