‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील कलाकारांनी याआधी निर्मात्यांवर विविध आरोप केले होते. आता पुन्हा एकदा निर्माते असितकुमार मोदी चर्चेत आले आहेत. यावेळी मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने निर्मात्यांवर मोठा आरोप केला आहे. मालिका सोडतेय म्हणून निर्माते मानसिक त्रास देत असल्याचं तिने म्हटलंय. याप्रकरणी आता मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकारलेली अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने तिला पाठिंबा दिला आहे.
याआधी जेनिफरनेही मालिका सोडताना निर्मात्यांवर शोषणाचा गंभीर आरोप केला होता. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. जेनिफरनंतर प्रिया अहुजा राजदा आणि मोनिका भादोरिया यांसारख्या कलाकारांनीही निर्मात्यांवर अशाच प्रकारचे आरोप केले होते. या मालिकेत बरीच वर्षे काम केलेले अभिनेते शैलेश लोढा यांनी निर्मात्यांवर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. हे प्रकरणसुद्धा कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. आता पलकला निर्मात्यांनी कायदेशीर नोटीस बजावल्यानंतर तिने मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला आहे.
पलकला पाठिंबा देत जेनिफर म्हणाली, “जे पलकसोबत आता घडतंय, ते या मालिकेच्या प्रत्येक सदस्यासोबत घडतंय. जी व्यक्ती मालिका सोडण्याचा निर्णय घेते, तिला अशीच वागणूक देतात. कोणत्याच कलाकाराला या मालिकेचे निर्माते शांतीने जाऊ देत नाहीत. ती जागा कलाकारांसाठी एखाद्या जेलसारखी आहे. राज अनाडकत, शैलेश लोढा, गुरुचरण सिंह या सर्वांनाही अशाच प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. त्यांचेही पैसे थकवले गेले होते. आता पलकसोबतही तेच करतील, अशी भीती आहे.”
‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांनी पलकला कायदेशीर नोटीस बजावली आहे. निर्मात्यांची लेखी परवानगी न घेतला पलकने इतर ब्रँडसोबत काम केल्याने कराराचं उल्लंघन झालंय, असं या नोटिशीत म्हटलंय. यामुळे मालिकेच्या निर्मात्यांना फटका सहन करावा लागला, म्हणूनच पलकला नोटीस बजावल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे पलकने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडण्यास तयार असल्याचं म्हटलंय. किंबहुना मालिका सोडत असल्यामुळेच निर्माते अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप तिने केला आहे.