मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. ही मालिका गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या कालावधीत बऱ्याच कलाकारांनी मालिका सोडली. तर काही नव्या कलाकारांची त्यात एण्ट्री झाली. या मालिकेला आधीसारखाच प्रतिसाद मिळावा यासाठी निर्मात्यांनी जुन्या भूमिकांना परत घेण्याचा विचार केला आहे. यामुळेच मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री झाली. राज अनाडकतने ही मालिका सोडल्यानंतर अभिनेता नितीश भालुनी सध्या टप्पूची भूमिका साकारतोय.
मालिकेत नव्या टप्पूची एण्ट्री झाली खरी, मात्र काही प्रेक्षकांनी या नव्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. नितीश भालुनी हा टप्पूच्या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं म्हणत काहींनी त्याला ट्रोल केलं. टप्पूच्या भूमिकेला तो योग्य न्याय देणार नाही, असं मत काहींनी नोंदवलं. त्यावर आता नितीशची प्रतिक्रिया समोर आली आहे.
“तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे. मात्र मला हेसुद्धा माहीत आहे की मला प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. म्हणूनच मी दिवस-रात्र काम करतोय. मला माहितीये की काही लोक माझं काम नापसंत करतील, ते माझ्यावर नाराजी व्यक्त करतील. मात्र हेसुद्धा त्यांचं प्रेमच असेल. मला माझ्या प्रतिभेवर विश्वास आहे आणि ती दाखवण्याची मी एकही संधी सोडणार नाही”, असं नितीश म्हणाला.
टप्पूच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी नितीश त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं त्याच्या या प्रतिक्रियेतून सहज स्पष्ट होतंय. राज अनाडकतशी तुलना केल्याबद्दल तो पुढे म्हणाला, “प्रत्येकाची स्वत:ची वेगळी विचारक्षमता असते आणि तो त्याच पद्धतीने भूमिकेला विणतो. मला वाटतं राजनेही त्याचप्रकारे भूमिकेला साकारलं, जसं त्याला अपेक्षित होतं. आता मी टप्पूला माझ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होईल आणि त्यांच्याकडून मलाही तितकंच प्रेम मिळेल याची मला खात्री आहे.”