मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सतत तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका चर्चेत आहे. मालिका प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन गेल्या 15 वर्षांपासून करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झालाय. इतकेच नाही तर काही वर्षांपासून मालिकेतील कलाकार (Artist) हे मालिकेला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. इतकेच काय तर थेट यांचा वाद कोर्टात पोहचला. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi) यांच्या अडचणीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.
शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामधील वाद सुरू असतानाच गेल्या कित्येक वर्षांपासून मिसेस सोढीची भूमिका साकारणारी टीव्ही अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिने थेट असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिच्या आरोपानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. याच्या अनेक क्लिप देखील व्हायरल झाल्या आहेत.
हे सर्व सुरू असतानाच मालिकेमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदौरिया हिने देखील नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर मोनिका भदौरिया हिने थेट मालिकेमध्ये दयाबेन अर्थात दिशा वकानी हिच्या पुनरागमनावर देखील थेट भाष्य केले आहे.
मोनिका भदौरिया म्हणाली की, फक्त जेनिफर मिस्त्री बंसिवाल हिच्यासोबतच नाही तर सेटवर असित मोदी यांनी अनेकांसोबत चुकीचा व्यवहार केला आहे. मात्र, मालिकेतील कलाकार यावर काहीच न बोलण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पोटाचा प्रश्न आहे. त्यांना कामाची गरज असल्यामुळेच ते असित मोदी विरोधात बोलू शकत नाहीत.
माझ्यासोबत देखील अनेकदा असित मोदींनी चुकीचा व्यवहार केला आहे. इतकेच काय तर दिशा वकानी हिच्यासोबतही तशाच प्रकारचा व्यवहार हा केला गेला. तुम्हाला काय वाटते, दिशा वकानी ही मालिकेत मुख्य भूमिकेत होती, निर्मात्यांनी तिला परत आणण्याचा प्रयत्न केला नसेल? निर्मात्यांनी खूप वेळा दिशा वकानीला आणण्याचा प्रयत्न केलाय.
दिशा वकानी हिला मालिकेत परत यायचेच नाहीये. बऱ्याच वेळा तिच्यासोबत चुकीचा व्यवहार केला गेला. मात्र, दिशा वकानी नेहमीच यांच्याकडे दुर्लक्ष करत होती आणि जाऊद्या म्हणायची. यांच्या चुकीच्या गोष्टींमुळेच दिशा वकानी ही मालिकेत पुनरागमन करत नाहीये, असे देखील मोनिका भदौरिया हिने म्हटले आहे.